मॉस्को : आधुनिक मानव हा होमो सेपियन्सचा वंशज मानला जातो; मात्र केवळ हीच एकमेव मनुष्य प्रजाती होती असे नव्हे. निएंडरथल, डेनिसोवन, होमो फ्लोरेसिएन्सिस यासारख्या अनेक मनुष्य प्रजाती विकसित झाल्या होत्या. त्यापैकी अनेक प्रजाती कालौघात एक तर नष्ट झाल्या किंवा होमो सेपियन्समध्ये मिसळून लुप्त झाल्या. 1 लाख 30 हजार वर्षांच्या काळात होमो सेपियन्स, निएंडरथल व डेनिसोवन यासारखे मानव ज्या मार्गाने सर्वत्र विखुरले किंवा स्थलांतरित झाले तो मार्ग पुरातत्त्व संशोधकांनी ताजिकीस्तानात शोधला आहे. तेथे त्यांना उत्खननात याबाबतचे पुरावे सापडले असून याठिकाणी तिन्ही प्रजातीचे मानव राहिले असल्याचे पुरावे सापडले आहेत. तिथे त्या काळातील दगडी अवजारे तसेच प्राण्यांची हाडेही सापडली आहेत.
पुरात्त्व संशोधकांना दीर्घकाळापासून याची कल्पना होती की आधुनिक माणूस आणि त्याचे जवळचे नातेवाईक असलेले मानव ज्याला ‘इनर एशियन माऊंटन कॉरिडॉर’ असे संबोधले जाते अशा मध्य आशियातील मार्गाने पाषाण युगात स्थलांतरित झाले होते. काळाच्या ओघात या भागात निएंडरथल, डेनिसोवन आणि आधुनिक मानवाच्या अस्तित्वाचे अनेक पुरावेही सापडत गेले. याठिकाणी कदाचित तिन्ही प्रजातीच्या मानवांची एकमेकांशी भेट होऊन त्यांच्यामध्ये संपर्कही झाला असावा, असे संशोधकांना वाटते. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘अँटिक्वीटी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण परिसर अद्यापही संशोधनाच्या द़ृष्टीने काहीसा दुर्लक्षितच राहिलेला आहे. इस्रायलमधील हिब—ु युनिव्हर्सिटी ऑफ जेरुसलेममधील इन्स्टिट्यूट ऑफ आर्कियोलॉजीमधील प्राध्यापक योस्सी झैदनर यांनी सांगितले की हा परिसर अनेक मानव प्रजातींसाठी स्थलांतराचा मार्ग राहिलेला असावा. त्यामध्ये आधुनिक होमो सेपियन मानव तसेच निएंडरथल व डेनिसोवन यांचा समावेश होतो. त्यांचे याठिकाणी सहअस्तित्वही राहिलेले असु शकते. या संशोधनासाठी झैदनर आणि त्यांच्या सहकार्यांनी मध्य आशियातील मुख्य नदी असलेल्या झेरावशान नदीच्या काठावरील पाषाणयुगातील ठिकाणांचा शोध घेतला. तेथील उत्खननात वेगवेगळ्या स्तरांमध्ये पाषाणयुगातील अनेक पुरावे आढळले. वेगवेगळ्या काळात याठिकाणी विविध मानवांनी आश्रय घेतला असल्याचे दिसून आले.