1500 year old relic | नॉर्वेमध्ये सापडले 1500 वर्षे जुने सोन्याचे ‘म्यान’

1500 year old relic |
1500 year old relic | नॉर्वेमध्ये सापडले 1500 वर्षे जुने सोन्याचे ‘म्यान’
Published on
Updated on

ओस्लो : नैॠत्य नॉर्वेमध्ये ‘मॉर्निंग वॉक’साठी बाहेर पडलेल्या एका व्यक्तीला एक असा अनपेक्षित खजिना सापडला आहे, ज्याने पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका झाडाखाली या व्यक्तीला 1500 वर्षांपूर्वी जाणीवपूर्वक जमिनीत गाडलेले एका एलिट योद्ध्याच्या तलवारीचे ‘म्यान’ सापडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती सकाळी फेरफटका मारत असताना त्याला एका झाडाखाली मातीचा ढिगारा दिसला. मी एका काठीने तो ढिगारा हलवून पाहिला, असे त्या व्यक्तीने नॉर्वेमधील स्टॅव्हँगर विद्यापीठाला दिलेल्या निवेदनात सांगितले. अचानक मला काहीतरी चमकताना दिसले. सुरुवातीला मला नक्की काय सापडले आहे, याचा अंदाजच आला नाही. सोन्यापासून बनलेली ही कलाकृती सहाव्या शतकातील असून ती सुमारे 2.4 इंच (6 सेमी) लांब आणि 33 ग्रॅम वजनाची आहे.

उत्तर युरोपमध्ये आतापर्यंत अशा केवळ 17 वस्तू सापडल्या आहेत. सहसा अशा वस्तू इतर वस्तूंच्या साठ्यात सापडतात, पण ही स्वतंत्रपणे सापडली आहे. यावर सापांसारख्या प्राण्यांची अत्यंत सुंदर आणि गुंतागुंतीची नक्षी कोरलेली आहे. या म्यानावरील खुणांवरून असे लक्षात येते की, संबंधित योद्ध्याने त्याचा बराच काळ वापर केला असावा. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मते, सहाव्या शतकातील हा काळ नैसर्गिक आपत्ती आणि सामाजिक उलथापालथीचा होता. ज्वालामुखीचे उद्रेक, प्रचंड थंडी आणि ‘ब्युबोनिक प्लेग’ची साथ यामुळे लोकसंख्या कमालीची घटली होती.

स्टॅव्हँगर संग्रहालयाचे पुरातत्वशास्त्रज्ञ हॅकोन रेयर्सन म्हणतात, ‘ज्याच्याकडे ही तलवार होती, तो सहाव्या शतकाच्या पहिल्या सहामाहीत या भागाचा प्रमुख नेता असावा. उपासमार आणि संकटाच्या काळात देवांना प्रसन्न करण्यासाठी किंवा आपली सत्ता आणि प्रतिष्ठा सिद्ध करण्यासाठी त्यांनी ही मौल्यवान वस्तू देवाला अर्पण केली असावी.‘ज्या भागात ही वस्तू सापडली, तेथील ‘होव्ह’ हे त्या काळातील सत्तेचे प्रमुख केंद्र होते. येथे यापूर्वीही सोन्याच्या अनेक वस्तू आणि मोठे शेत-प्रकल्प सापडले आहेत, जे इथल्या लोकांच्या वैभवशाली जीवनशैलीची साक्ष देतात. संकटकाळात देवांना अशा मौल्यवान वस्तूंचा बळी देऊन येथील नेते आपली शक्ती दाखवून देत असत, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news