

जयपूर : राजस्थानातील पुष्कर येथील प्राण्यांचा बाजार सध्या देशभरामध्ये चर्चेत आहे, तो येथील दोन प्राण्यांमुळे! भारतभरात या कृषी मेळ्याची चर्चा होण्याचं कारण ठरत आहेत एक घोडा आणि एक रेडा! एखाद्या बीएमडब्ल्यू, मर्सिडीज गाडीलाही लाजवेल इतकी या घोड्याची आणि रेड्याची किंमत आहे. 65 लाखांच्या टेस्लाचा विचार केला, तर अशा 35 टेस्ला विकत घेता येतील एवढा महाग हा रेडा असून, घोड्याची किंमत इतकी आहे की, त्यामध्ये 23 टेस्ला विकत घेता येतील.
देशातील सर्वात प्रसिद्ध पशुधन मेळ्यांपैकी एक अशी ओळख असलेल्या हा पशुमेळा ऑक्टोबरपासून नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. देशभरातील पशुपालक आणि पशुधनप्रेमी नागरिक पहिल्या दिवसापासून गर्दी करतात. मेळ्यासाठी आतापर्यंत चार हजार 300 हून अधिक जनावरांची नोंदणी झाली असून, त्यात तीन हजार 28 घोडे आणि एक हजार 306 उंटांचा समावेश आहे. मात्र, सर्वात जास्त लक्ष वेधून घेतो आहे, दोन वर्षे सहा महिन्यांचा शाहबाज नावाचा घोडा. तो चंडीगड येथील गॅरी गिल यांच्या मालकीचा आहे.