Generator From Waste | तेरा वर्षांच्या मुलाने भंगारापासून बनवला विजेसाठी जनरेटर!

Generator From Waste |
Generator From Waste | तेरा वर्षांच्या मुलाने भंगारापासून बनवला विजेसाठी जनरेटर!
Published on: 
Updated on: 

जोहान्सबर्ग : एका १३ वर्षांच्या मुलाने असा काही पराक्रम करून दाखवला आहे, जो करण्यासाठी मोठमोठ्या वैज्ञानिकांनाही घाम फुटतो आणि कित्येक वर्षे लागतात. जग ज्याला ‘भंगार’ किंवा कचरा समजून फेकून देते, त्याच टाकाऊ वस्तूंपासून या मुलाने असे काही नवसंशोधन केले आहे, जे पाहून संपूर्ण जग अवाक् झाले आहे. हा कारनामा पश्चिम आफ्रिकेतील ‘सिएरा लिओन’ या देशाची राजधानी फ्रिटाऊन येथे राहणाऱ्या केल्विन डो या मुलाने केला आहे.

तो ड्वोरजार्क या अत्यंत बिकट परिस्थिती असलेल्या भागात लहानाचा मोठा झाला, जिथे आठवड्यातून जेमतेम एकदाच वीज यायची. बाकीच्या वेळी वीज गायब असायची. ‘ना उजेड, ना वीज’ आणि कोणतीही वस्तू चार्ज करण्यासाठी कसलेच साधन नव्हते. ड्वोरजार्क भागातील बहुतांश लोक विजेच्या येण्या-जाण्याला हवामानासारखी एक अपरिहार्य गोष्ट मानत असत, जी सहन करावीच लागते. परंतु, पाच भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या केल्विनसाठी ही एक अशी समस्या होती, जिचे उत्तर कचऱ्यात दडलेले होते. त्याने अवघ्या १० ते ११ वर्षांच्या वयातच भंगाराची दुकाने आणि कचऱ्याच्या डब्यांमधून इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू शोधण्यास सुरुवात केली. तो जुन्या तारा, धातू आणि टाकाऊ सुटे भाग घरी आणायचा, ते उघडून त्यांचा अभ्यास करायचा आणि त्यातून नवीन काहीतरी बनवायचा.

केल्विनचा पहिला खरा आविष्कार म्हणजे त्याने स्वतः बनवलेली ‘बॅटरी’. सतत वीज जात असल्याने त्याला बॅटरीची गरज भासायची आणि ती वारंवार विकत घेणे त्याला परवडणारे नव्हते. म्हणून त्याने स्वतःची बॅटरी बनवण्याचा निर्णय घेतला. अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर त्याला एक सोपी आणि काम करणारी पद्धत सापडली. बॅटरी बनवल्यानंतर तो थांबला नाही. त्याने कचऱ्यात फेकून दिलेल्या व्होल्टेज स्टॅबिलायझरचा वापर करून एक जनरेटर तयार केला, जेणेकरून त्याला विजेची सतत गरज भागवता येईल. यानंतर त्याचा जीवन बदलणारा शोध आला. टाकाऊ भागांना जोडून त्याने एक ‘FM ट्रान्समीटर’, मिक्सर, ॲम्प्लीफायर आणि मायक्रोफोन व्हॉईस रिसीव्हर स्वतः बनवला. २०१२ मध्ये, केल्विनने ‘इनोव्हेट सॅलोन’ या स्पर्धेत भाग घेतला.

ही ‘ग्लोबल मिनिमम’ या ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेची राष्ट्रीय हायस्कूल नावीन्यता स्पर्धा होती. यामध्ये स्पर्धकांना स्थानिक समस्यांवर उपाय शोधण्यास सांगण्यात आले होते. केल्विनने घरीच बनवलेला एफएम ट्रान्समीटर अंतिम आठ उत्कृष्ट प्रोजेक्‍टस् मध्ये निवडला गेला. त्या ठिकाणी ‘MIT मीडिया लॅब’चे सिएरा लिओन येथील डॉक्टरेट विद्यार्थी डेव्हिड सेंगेह यांची नजर केल्विनवर पडली. सेंगेह यांना तात्काळ लक्षात आले की, हा एक असा स्व-प्रशिक्षित अभियंता आहे, ज्याने कधीही न शिकवलेले तंत्रज्ञान केवळ कबाडाच्या साहाय्याने नव्याने तयार केले आहे. सेंगेह यांनी केल्विनला अमेरिकेत आणण्यास मदत केली आणि त्या वर्षी केल्विन MIT च्या ‘विझिटिंग प्रॅक्‍टिशनर प्रोग्राम’मध्‍ये सहभागी झाला. अवघ्या १५ वर्षांचा असताना या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी आमंत्रित केला गेलेला तो इतिहासातील सर्वात तरुण व्यक्ती बनला!

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news