...म्हणून बिस्किटांना असतात अनेक छिद्रे | पुढारी

...म्हणून बिस्किटांना असतात अनेक छिद्रे

नवी दिल्ली : क्रिस्पी, टेस्टी बिस्किटे खाण्यास बहुतेक सर्वांनाच आवडतात. चहाबरोबर ही बिस्किटे आणखी चवदार लागतात. यामुळेच जगभरात बिस्किटांचा बाजार हजारो कोटी रुपयांच्या घरात आहे. चव व अन्य गुणांच्या आधारावर बिस्किटांची मागणी असते. लहानग्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्यासाठी खास बिस्किटांची निर्मिती केली जाते. आता तर मधुमेहींसाठी शुगर फ्री बिस्किटेही बाजारात उपलब्ध आहेत.

बिस्किटे अनेक प्रकारच्या आकारांत आणि डिझाईन्समध्ये असतात. मात्र, या बिस्किटांमध्ये एक गोष्ट समान असते. ती म्हणजे, बिस्किटात असणारी छिद्रे. बिस्किटांना ही छिद्रे का बनविली जातात, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? बहुतेक लोकांना वाटते की, बिस्किटांना आकर्षक बनविण्यासाठी छिद्रे्र केली असणार. मात्र, हा समज साफ चुकीचा आहे.

खरे तर बिस्किटांना असलेल्या छिद्रांना ‘डॉकर्स’ असे म्हटले जाते. बेकिंगच्या वेळी या छिद्रांतून हवा निघून जाते. या छिद्रांमुळे बिस्कीट जास्त फुगत नाही, अथवा त्याचा आकारही बदलत नाही.

बिस्किटांना आकार कायम राहावा म्हणून मशिनच्या मदतीने समान अंतरावर बिस्किटांवर छिद्रे काढली जातात. यामुळे ते चारीही बाजूने चांगले भाजले जाते. त्यानंतर ते क्रंची आणि क्रिस्पी बनतात. बिस्किटांना छिद्रे बनविण्यास एक शास्त्रीय कारण जबाबदार आहे, ते म्हणजे बिस्कीट तयार करताना त्याच्यातील उष्णता बाहेर काढणे. जर ही उष्णता बाहेर काढली नाही तर बिस्किटे मध्येच तुटू लागतात आणि प्रसंगी त्याचा आकारही बदलतो.

Back to top button