Old clothes discovery | ओरेगॉनच्या गुहेत सापडले 12,000 वर्षे जुने कपडे

Old clothes discovery
Old clothes discovery | ओरेगॉनच्या गुहेत सापडले 12,000 वर्षे जुने कपडेSophie Berdugo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : जगातील सर्वात जुने शिवलेले कपडे हे प्राण्यांच्या कातड्याचे तुकडे असू शकतात, जे सुमारे 12,000 वर्षांपूर्वी हिमयुगाच्या काळात ओरेगॉनमधील एका गुहेत सोडण्यात आले होते. अमेरिकेतील ओरेगॉन येथे सापडलेल्या या अवशेषांवरून प्राचीन काळातील मानवाच्या प्रगत शिवणकलेचे दर्शन घडत असल्याचे एका नवीन अभ्यासात समोर आले आहे.

‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात 4 फेब—ुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, स्थानिक आदिवासींनी प्राण्यांच्या कातड्याला वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांपासून बनवलेल्या दोरीने किंवा सुतळीने एकत्र शिवले होते. हा कापडाचा अवशेष नेमका कशासाठी वापरला जात असे, हे पूर्णपणे स्पष्ट नसले, तरी संशोधकांच्या मते हा कपड्याचा किंवा पादत्राणांचा भाग असण्याची दाट शक्यता आहे. हे अवशेष ‘यंगर ड्रायस’ काळातील आहेत, जेव्हा साधारण 12,900 ते 11,700 वर्षांपूर्वी पृथ्वीवर अचानक थंडी वाढली होती. गुहेत प्राण्यांच्या कातड्याचे शिवलेले तुकडे, सुतळी आणि दोरखंडासह एकूण 55 वस्तू सापडल्या आहेत.

प्लाइस्टोसीन युगातील सापडलेला हा अशा प्रकारचा एकमेव कपडा आहे. उत्तर अमेरिकेतील मूळ रहिवाशांनी कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी नाशवंत साहित्यापासून जटिल तंत्रज्ञान विकसित केले होते, याचा हा एक भक्कम पुरावा आहे. केवळ अंगावर कातडे पांघरण्यापेक्षा, ते शिवून शरीराला फिट बसणारे कपडे तयार केल्यामुळे त्यांना थंडीत अधिक ऊब मिळत असे. ‘ते हिमयुगातील अत्यंत कुशल आणि गंभीर शिवणकाम करणारे लोक होते. ते असे कपडे वापरत असतील, असा आमचा अंदाज होताच; पण या शोधामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे,’ असे युनिव्हर्सिटी ऑफ नेवाडा येथील मानववंशशास्त्राचे संशोधक रिचर्ड रोझेनक्रान्स यांनी सांगितले. माणसाने नक्की कधीपासून कपडे घालायला सुरुवात केली, हे शोधणे कठीण असते; कारण कापड किंवा कातडे हे साहित्य काळानुसार नष्ट होते. पश्चिम गोलार्धात अशा प्रकारच्या वस्तू सापडलेली केवळ चार ठिकाणे आहेत आणि ती सर्व ओरेगॉन व नेवाडा भागात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news