

तिरुमला : वयाच्या ११६ व्या वर्षी भगवान व्यंकटेश्वर स्वामींचे आशीर्वाद घेण्यासाठी एका आजींनी चक्क पायी चालत डोंगर चढला आहे. या प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला. मुख्यमंत्र्यांनी आजींच्या धैर्याचे कौतुक करत लिहिले की,‘‘जर श्रद्धा खरी असेल, तर वय फक्त एक आकडा असतो.’’
कर्नाटकच्या नवनीथम्मा यांच्या या अद्भुत प्रवासाचे मंदिर प्रशासनानेही भरभरून कौतुक केले आहे. संपूर्ण इंटरनेटवर सध्या नवनीथम्मा यांचा दृढनिश्चय, उत्साह आणि त्यांच्या भक्तीभावाची प्रशंसा होत आहे. त्यांनी आपल्या कुटुंबासह पवित्र तिरुमला मंदिराची चढाई त्याच मार्गाने पूर्ण केली, ज्या मार्गावरून हजारो भाविक श्रद्धेने चालत येतात.
आजींचे धैर्य आणि श्रद्धा पाहून प्रभावित झालेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानमने सोमवारी पहाटेच नवनीथम्मा आणि त्यांच्या कुटुंबासाठी एका विशेष व्हीआयपी ‘ब्रेक दर्शनाची’ व्यवस्था केली. ११६ वर्षांच्या या आजींच्या कथेने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांचेही मन जिंकले. नवनीथम्मा यांचा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री नायडू यांनी लिहिले, ‘‘सच्च्या भक्तीच्या बाबतीत वय खरोखरच फक्त एक आकडा आहे! कर्नाटकच्या या ११६ वर्षीय आजींना पाहून मी थक्क झालो आहे आणि प्रभावितही झालो आहे. अम्मांनी भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या दिव्य दर्शनासाठी तिरुमलापर्यंतचा संपूर्ण प्रवास पायी पूर्ण केला. त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या या आयुष्यभराच्या श्रद्धेला साथ देताना पाहणे खूप छान वाटले. खरोखरच प्रेरणादायी!’’