

लंडन : इंग्लंडच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा एक अतिशय दुर्मीळ खजिना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नवव्या शतकातील सोन्याचा आणि मौल्यवान रत्नांचा वापर करून बनवलेला आल्फ्रेड ज्वेल हा ऐतिहासिक ठेवा संशोधकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. या दागिन्यावर चक्क आल्फ्रेडने मला बनवण्याची आज्ञा दिली असा मजकूर कोरलेला आहे.
आल्फ्रेड द ग्रेट याला इंग्लंडचा पहिला रोजा मानले जाते. त्यानेच विखुरलेल्या अँग्लो-सॅक्सन राज्यांना एकत्र करून इंग्लंड या राष्ट्राचा पाया रचला. हा दागिना त्याच्याच काळातील असून, तो त्याच्या राजेशाही थाटाचे प्रतीक आहे. या दागिन्याच्या कडांवर जुन्या इंग्रजी भाषेत ‘आल्फ्रेडने मला बनवण्याची आज्ञा दिली,’ असे शब्द कोरलेले आहेत. हा दागिना सोन्याच्या तारेच्या नाजूक कामात गुंफलेला असून, त्यावर पारदर्शक रॉक क्रिस्टल (स्फटिक) बसवलेले आहे. या क्रिस्टलच्या खाली निळ्या आणि हिरव्या रंगात एका व्यक्तीची आकृती चित्रीत केलेली आहे.
संशोधकांच्या मते, हा केवळ शोभेचा दागिना नव्हता. हा अॅस्टेल नावाच्या एका दांडीचा भाग असावा, ज्याचा वापर राजे किंवा विद्वान लोक धार्मिक पुस्तके वाचताना ओळींवरून फिरवण्यासाठी करत असत. एका माहितीनुसार ‘आल्फ्रेड द ग्रेट’ या शिक्षणाला खूप महत्त्व दिले होते. त्याने अनेक लॅटिन ग्रंथांचे इंग्रजीत भाषांतर करवून घेतले आणि त्यासोबत असे मौल्यवान अॅस्टेल भेट म्हणून पाठवले होते. हा दागिना 1693 मध्ये सॉमरसेट येथे सापडला होता, जे ठिकाण राजा आल्फ्रेड याच्या अथेलनी किल्ल्याजवळ होते. हा ऐतिहासिक खजिना सध्या ऑक्सफर्डमधील अॅशमोलियन म्युझियममध्ये जतन करून ठेवण्यात आला असून, तो मध्ययुगीन इंग्लंडच्या प्रगत कलाकुसरीचा उत्तम नमुना मानला जातो.