‘या’ भावी जावईबापूंचा जंगी पाहुणचार; कुटुंबाने बनवले तब्‍बल ३६५ खाद्यपदार्थ! | पुढारी

'या' भावी जावईबापूंचा जंगी पाहुणचार; कुटुंबाने बनवले तब्‍बल ३६५ खाद्यपदार्थ!

हैदराबाद : आपल्या देशात जावयाला जितका मान मिळतो तितका कुणालाही मिळत नसेल. आता तर आंध्र प्रदेशात सणानिमित्त घरी आलेल्या भावी जावयाच्या पाहुणचारासाठी तब्बल 365 खाद्यपदार्थ बनवण्यात आले! अनेक ठिकाणी देवादिकांना ‘छप्पन भोग’ म्हणजेच 56 प्रकारच्या खाद्यपदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. मात्र, या घरात भावी जावईबापूंसाठी त्यापेक्षाही किती तरी अधिक म्हणजे 365 पदार्थ बनवण्यात आले!

आपल्याकडे पहिल्या दिवाळसणासाठी जावयाला जसे मानाने बोलावले जाते किंवा अधिक महिन्यात जावयाचा जसा मानपान केला जातो तसे आंध— प्रदेशात संक्रांतीच्या वेळी आमंत्रित केले जाते. पश्चिम गोदावरी येथील नर्सापरम येथील एका कुटुंबानेही आपल्या भावी जावईबापूंना आमंत्रित केले होते. त्याच्या पाहुणचारासाठी वेगवेगळ्या मिठाया, शाकाहारी-मांसाहारी पदार्थ यांच्या 365 डिशेश तयार करण्यात आल्या.

जणू काही वर्षभराचा पाहुणचार या कुटुंबाने एकाच दिवसात उरकून टाकला! आता या 365 पदार्थांची छायाचित्रे देशभर व्हायरल होत आहेत. अत्यत व्यंकटेश्वर राव हे या जावईबापूंचे सासरे असून ते सोन्याचे व्यापारी आहेत. त्यांची कन्या कुंडवी हिचे लग्न साईकृष्णा या तरुणाशी ठरले होते व संक्रांतीनंतर ते थाटामाटात झाले. लग्नाची तयारी सुरू असतानाच या भावी जावयाला सणासाठी बोलावून त्याचा असा थाटात पाहुणचार करण्यात आला.

Back to top button