

जयपूर : अनेक गावांमध्ये काही स्थानिक मान्यता, अनोखे समज असतात. राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील उडसर नावाचे गावही असेच अनोखे आहे. या गावात गेल्या 700 वर्षांपासून कुणीही दुमजली घर बांधलेले नाही. जर दुमजली घर बांधले तर संबंधित कुटुंबाला संकटांचा सामना करावा लागतो असा गावात समज आहे. तसा शापच या गावाला मिळालेला असल्याचेही सांगितले जाते.
याबाबत तिथे एक दंतकथा सांगितली जाते. त्यानुसार सातशे वर्षांपूर्वी गावात 'भेमिया' नावाचा एक व्यक्ती राहत होता. एके दिवशी त्याला समजले की गावात चोर आले आहेत. हे चोर गावातील पशू चोरून नेऊ लागले आणि ते पाहून भेमिया एकटाच त्यांना जाऊन भिडला. चोरांनी त्याला घायाळ केले आणि रक्तबंबाळ झाला. या चोरांपासून बचाव करण्यासाठी तो आपल्या सासूरवाडीत गेला व घराच्या दुसर्या मजल्यावर जाऊन लपून बसला. चोरांनी त्याचा पाठलाग केला व तिथेही त्याला पकडले. यावेळी भेमियाबरोबर त्याच्या सासूरवाडीतील लोकांनाही मार खावा लागला. जखमी असतानाही भेमियाने चोरांचा प्रतिकार केला, मात्र चोरांनी त्याचा गळा चिरून त्याला मारून टाकले.
डोके कापलेल्या अवस्थेतही तो लढत राहिला आणि त्याचे धड स्वतःच्या गावाच्या सीमेत येऊन कोसळले. याची माहिती त्याच्या पत्नीला समजल्यावर तिने गावाला शाप दिला की कुणीही गावात दोन मजल्यांचे घर बनवले तर त्या कुटुंबाचा विनाश होईल! गावात या भेमियाचे मंदिरही असून अद्यापही या दंतकथेवर विश्वास ठेवून कुणीही दोन मजली घर बनवलेले नाही.