

झेजियांग : आजच्या आधुनिक काळात हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे लवकर उठणे, योगा करणे, वेळेवर झोपणे आणि जंक फूडपासून दूर राहणे असे मानले जाते; पण चीनमधील 101 वर्षांच्या एका आजींनी या सर्व नियमांना जणू आव्हानच दिले आहे. या आजी ना लवकर झोपतात, ना सकाळी लवकर उठतात आणि ना कडक आहार पाळतात. तरीही त्या पूर्णपणे तंदुरुस्त आहेत, मानसिकदृष्ट्या सक्रिय आहेत आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे सर्व दात अजूनही शाबूत आहेत.
जियांग यांच्या दीर्घायुष्याचे सर्वात मोठे कारण, कदाचित त्यांची विचारसरणी आणि स्वभाव आहे. कुटुंबीय सांगतात की, त्या अतिशय शांत स्वभावाच्या आहेत, पटकन रागावत नाहीत आणि कोणाशीही वैर धरून ठेवत नाहीत. नकारात्मक गोष्टींवर जास्त लक्ष देत नाहीत आणि प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर त्यांच्या दिनचर्येचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांसह डॉक्टरही चकित झाले आहेत की, इतकी बेफिकीर जीवनशैली असूनही इतके दीर्घायुष्य कसे काय? चीनच्या झेजियांग प्रांतातील वेंझोउ शहरात राहणाऱ्या जियांग युएछिन यांची दिनचर्या इतर वृद्धांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. जिथे बहुतेक वृद्ध रात्री 9-10 वाजेपर्यंत झोपतात, तिथे जियांग रात्री जवळपास 2 वाजेपर्यंत टीव्ही पाहत बसतात. त्यानंतर त्या आरामात झोपतात आणि सकाळी साधारण 10 वाजता उठतात.
कुटुंबीयांच्या मते, त्यांना झोपेची कोणतीही समस्या नाही आणि त्यांची झोप खोल व सलग असते. जियांग यांचा आहार कोणत्याही आहारतज्ज्ञाला चकित करू शकतो. त्या अनेकदा नाश्ता करतच नाहीत आणि आपले पहिले जेवण उशिरा सकाळी घेतात. संध्याकाळी त्या लवकर जेवण करतात आणि रात्री भूक लागली तर पुन्हा स्नॅक्स खातात. त्यांच्या आवडत्या पदार्थांमध्ये पारंपरिक वेंझोउ मिठाया, बिस्किटे, चिप्स, शकिमा आणि वाळलेले रताळे यांचा समावेश आहे. म्हणजेच त्यांच्या आहारात जंक फूडची कमतरता नाही, असे स्पष्टपणे म्हणता येईल.
मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, त्या कधीही गरजेपेक्षा जास्त खात नाहीत आणि फक्त भूक लागली तेव्हाच खातात. अति खाणे टाळणे आणि शरीराचे संकेत समजून घेणे हे त्यांच्या चांगल्या आरोग्याचे एक मोठे कारण मानले जाते. जियांग यांचे 101 वय असूनही त्यांना ना कृत्रिम दात बसवावे लागले आहेत, ना कोणताही मोठा दंतउपचार करावा लागला आहे. कुटुंबीयांच्या मते, त्या नेहमी हळूहळू आणि लक्षपूर्वक जेवतात. कधीही घाई करत नाहीत आणि प्रत्येक घास नीट चावून खातात. डॉक्टरांचे मत आहे की, या सवयींमुळेच त्यांचे दात मजबूत राहण्यास मदत झाली आहे. याशिवाय त्या रोज सकाळी एक कप ग््राीन टी नक्की पितात, जी अँटिऑक्सिडंटस्ने समृद्ध मानली जाते.