1000 Year Old Silver Treasure | घराच्या परसात सापडला हजार वर्षांपूर्वीचा चांदीचा खजिना

1000 Year Old Silver Treasure |
1000 Year Old Silver Treasure | घराच्या परसात सापडला हजार वर्षांपूर्वीचा चांदीचा खजिना
Published on
Updated on

कोपनहेगन : डेन्मार्कमधील एका घरमालकाला त्याच्या घराच्या मागच्या परसात बांधकामासाठी उत्खनन करत असताना मोठा खजिना सापडला आहे. जमिनीखाली गाडलेले तब्बल १८.५ किलोग्रॅम (४० पाऊंड) वजन असलेले एक हजार वर्षांपूर्वीचे चांदीचे अवशेष येथे आढळले आहेत. संशोधकांच्या मते, हा शोध डेन्मार्कच्या इतिहासामधील ‘विकिंग युग’ (इ. स. ७९३ ते १०६६) काळातील चांदीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा खजिना ठरला आहे.

या खजिन्यामध्ये सुमारे ७०० चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये चांदीचे बिस्किट/पट्ट्या, दागिने, ४७ संपूर्ण नाणी व नाण्यांचे तुकडे आणि ‘थॉरचा हातोडा’ या लहान आकृतीचा समावेश आहे. थॉरचा हातोडा हे संरक्षणाचे प्रतीक आणि मालकाचा नॉर्स देवांवर विश्वास असल्याचे दर्शवणारे चिन्ह मानले जाते. यातील सुमारे ३२० वस्तू एका मातीच्या मडक्यात ठेवल्या होत्या, तर उर्वरित वस्तू बाजूच्या मातीत पसरलेल्या होत्या. अधिकृत निवेदनानुसार, हा खजिना डेन्मार्कमध्ये यापूर्वी सापडलेल्या विकिंग काळातील सर्वात मोठ्या चांदीच्या खजिन्यापेक्षा तब्बल तीन पट मोठा आहे.

‘रेबिल्ड’ नगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीला या वर्षाच्या सुरुवातीला हे काम करत असताना हा खजिना सापडला. गच्चीसाठी काम करताना अचानक एका कठीण वस्तूवर फावडे आदळले आणि वेगळाच आवाज आला. त्या घरमालकाने सांगितले, ‘नवीन टेरेससाठी गवत, दगड आणि खडी काढण्याचे काही तासांचे कष्टाचे काम मी करत होतो; पण हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे आश्चर्य ठरेल, असे मला वाटले नव्हते.’ यातील एका चांदीच्या पट्टीवर ‘रून्स’ लिपीतील कोरीव काम आहे, जी विकिंग काळात स्कॅन्डिनेव्हियामध्ये वापरली जाणारी लेखन पद्धत होती. त्यावर ‘hutu’ असे लिहिले असू शकते, जे एखाद्या व्यक्तीचे नाव किंवा मालकाची खूण असू शकते. सापडलेल्या नाण्यांमध्ये ‘किंग एडवर्ड द एल्डर’ (शासनकाळ इ. स. ८९९ ते ९२४) यांच्या काळातील दोन अँग्लो-सॅक्सन चांदीच्या पेनीचा (नाण्यांचा) समावेश आहे.

यावरून हा खजिना १० व्या शतकातील असावा असा अंदाज लावण्यात आला आहे. उत्तर जुटलँड संग्रहालयाचे सांस्कृतिक वारसा व्यवस्थापक टोरबेन साराउ यांनी सांगितले की, ‘या खजिन्यात इस्लामिक नाणीदेखील आहेत. अँग्लो-सॅक्सन आणि इस्लामिक नाणी एकत्र मिळणे हे सिद्ध करते की, विकिंग काळातील डेन्मार्कचे युरोप आणि दूरच्या पूर्वेकडील प्रदेशांशी मजबूत व्यापारी संबंध होते.’ हा नवीन खजिना विकिंग काळातील लोक आपली संपत्ती कशी साठवून, आयोजित करून आणि लपवून ठेवत असत यावर प्रकाश टाकतो. साराऊ पुढे म्हणाले, ‘जेव्हा आपण या चांदीच्या वस्तूंच्या वजनाचे विश्लेषण करतो, तेव्हा हा खजिना विकिंग युगातील आर्थिक पद्धतींबद्दल महत्त्वाची माहिती देतो. हा खजिना केवळ सुंदर वस्तूंचा संग्रह नाही, तर यातील बहुतांश वस्तू वजनावर आधारित एका संरचित मूल्य प्रणालीचा भाग आहेत.’

logo
Pudhari News
pudhari.news