Zombie fly: झाडाच्या डिंकात जतन झालेली 100 दशलक्ष वर्षांपूर्वीची ‌‘झोम्बी‌’ माशी

सुमारे 9.9 कोटी वर्षांपूर्वी, जेव्हा पृथ्वीवर डायनासोरचे राज्य होते, तेव्हा निसर्गात एक अत्यंत भयानक घटना घडली होती
Zombie fly
Zombie flypudhari
Published on
Updated on

न्यूयॉर्क : सुमारे 9.9 कोटी वर्षांपूर्वी, जेव्हा पृथ्वीवर डायनासोरचे राज्य होते, तेव्हा निसर्गात एक अत्यंत भयानक घटना घडली होती. झाडाच्या डिंकात (अम्बरमध्ये) जतन झालेल्या एका प्राचीन अवशेषातून शास्त्रज्ञांनी अशा एका माशीचा शोध लावला आहे, जिच्या डोक्यातून जीवघेणी बुरशी बाहेर येत आहे. हे स्पष्ट लक्षण आहे की त्या माशीचे रूपांतर एका ‌‘झोम्बी‌’मध्ये झाले होते.

म्यानमारमध्ये सापडलेल्या 100 दशलक्ष वर्षे जुन्या ‌‘अम्बर‌’मध्ये (झाडाचा कडक झालेला डिंक) एक माशी आणि एक मुंगी अशा स्थितीत सापडले आहेत, जे पाहून एखाद्या हॉरर चित्रपटाची आठवण येते. या दोघांच्याही डोक्यातून बुरशी बाहेर पडताना दिसत आहे. संशोधकांच्या मते, ही ‌‘ओफिओकॉर्डिसेप्स‌’ नावाची प्राचीन बुरशी आहे. ही तीच बुरशी आहे जी आजही मुंग्यांच्या मेंदूवर ताबा मिळवून त्यांना जिवंतपणी ‌‘झोम्बी‌’ बनवते.

संशोधकांनी ‌‘पॅलिओओफिओकॉर्डिसेप्स‌’ नावाच्या दुसऱ्या एका प्राचीन बुरशीचाही शोध लावला आहे. ही बुरशी केवळ आपल्या भक्ष्याला मारत नाही, तर मृत्यूनंतरही त्यांच्या शरीरावर नियंत्रण ठेवते. ही बुरशी मृत कीटकांच्या शरीरात हालचाल घडवून आणायची, जेणेकरून तिचे बीजाणू नवीन ठिकाणी पसरू शकतील. कीटकांच्या डोक्यातून बाहेर आलेले विचित्र भाग हे प्रत्यक्षात या बुरशीचे पुनरुत्पादनाचे अवयव आहेत. संशोधक युहुई झुआंग आणि त्यांच्या टीमने 3 डी स्कॅनच्या मदतीने या बुरशीचे दोन नवीन प्रकार शोधले आहेत. या शोधातून हे सिद्ध होते की, कीटकांना ‌‘झोम्बी‌’ बनवण्याची ही प्रक्रिया लाखो वर्षांपासून सुरू आहे.

आजच्या काळात ही बुरशी प्रामुख्याने मुंग्यांवर हल्ला करते आणि त्यांना उंचावर चढण्यास भाग पाडते, जेणेकरून तिचे बीजाणू वाऱ्यासोबत लांबवर पसरतील. मात्र, या पुरातन अवशेषात मुंगीऐवजी ‌‘माशी‌’ या बुरशीची शिकार झाल्याचे दिसल्याने शास्त्रज्ञ चकित झाले आहेत. हे कीटक झाडाच्या चिकट डिंकात अडकण्यापूर्वीच बहुधा मृत पावले असावेत. त्या डिंकामुळेच त्यांचे शरीर आणि त्यांच्यावरील ती भयावह बुरशी 100 दशलक्ष वर्षांनंतरही अतिशय स्पष्टपणे जतन झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news