

टोकियो : शाळेतील मुले अभ्यासानंतर सामान्यतः खेळण्यात किंवा टीव्ही, मोबाईल पाहण्यात वेळ घालवतात. परंतु, जपानमधील कोबे येथे राहणाऱ्या अवघ्या १० वर्षांच्या ‘जो नगाई’ या बालकाने आपला मोकळा वेळ ‘स्वॅलोटेल’ (Swallowtail) प्रजातीची फुलपाखरे पाळण्यात घालवला. पंखांच्या कडांवर चमकदार ठिपके असलेल्या एशियन स्वॅलोटेल फुलपाखरांची काळजी घेताना त्याला त्यांचे एक रंजक वर्तन दिसून आले. जेव्हा तो त्यांना मोकळ्या जागेत सोडायचा, तेव्हा ती काही वेळ हवेत घिरट्या घालून पुन्हा त्याच्याकडेच परत यायची. यावरून त्याच्या मनात शंका निर्माण झाली की फुलपाखरे त्याला ओळखतात का? याच प्रश्नाचे उत्तर शोधताना नगाईने असे संशोधन केले, ज्याने जगभरातील तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जो नगाईने या विषयावर वैज्ञानिक अभ्यास शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याला समजले की जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीच्या प्रसिद्ध कीटकशास्त्रज्ञ (Entomologist) डॉ. मार्था व्हाइस यांनी ‘सुरवंटाच्या (Caterpillar) काळातील आठवणी फुलपाखरू झाल्यावरही राहतात का?’ यावर सर्वात आधी अभ्यास केला होता. नगाईने आपल्या प्रश्नांसह डॉ. व्हाइस यांना एक मोठा ई-मेल पाठवला. कमी वयातही जो नगाईची ही उत्सुकता पाहून डॉ. व्हाइस प्रभावित झाल्या आणि त्यांनी त्याच्या ई-मेलला उत्तर दिले. लवकरच त्यांच्यात खंडपरत्वे वैज्ञानिक मार्गदर्शन (Mentorship) सुरू झाले. विद्यापीठाच्या प्राध्यापिका आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांनी मिळून प्रयोगशाळेतील कठीण पद्धतींना मुलांसाठी सोप्या आणि रंजक प्रयोगात बदलले, जे प्रयोग नगाईने आपल्या घरीच केले. सुरवंटाचे फुलपाखरात रुपांतर होण्यासाठी त्याला कायापालट किंवा ‘मेटामॉर्फासिस’ या प्रक्रियेतून जावे लागते. सुरवंट स्वतःला कोशात बंद करून घेतो, जिथे त्याचे शरीर पूर्णपणे विघटित होते आणि पुनर्रचना पावते. याला ‘तरल अवस्था’ (Fluid phase) देखील म्हणतात. आता नगाईसमोर प्रश्न होता की सुरवंटाला अशी कोणती आठवण द्यावी, जी फुलपाखरू झाल्यावरही त्याच्या लक्षात राहील? जोने घरातील सोप्या वस्तूंचा वापर करून प्रयोग डिझाइन केला. मसल थेरपी डिव्हाइसच्या सौम्य इलेक्ट्रॉनिक पल्सचा वापर करून जोने सुरवंटांच्या एका लहान गटाला लॅव्हेंडर तेलाच्या सुगंधाचा संबंध व्हायब्रेटिंग स्टिम्युलसशी जोडायला शिकवले. या सुरवंटांना तो सुगंध फारसा आवडत नव्हता, पण त्यामुळे त्यांना कोणतीही हानी पोहोचली नाही. त्याने दुसऱ्या नियंत्रित गटाला कोणतेही प्रशिक्षण दिले नाही. कायापालट प्रक्रियेदरम्यान शरीराच्या पूर्ण विघटनानंतरही लॅव्हेंडरपासून दूर राहण्याची ही आठवण टिकून राहील का? हा मुख्य प्रश्न होता. जेव्हा कोशातून सुंदर फुलपाखरे बाहेर आली, तेव्हा नगाईने ‘Y-आकाराच्या’ नळीच्या चक्रव्यूहाचा वापर करून त्यांची चाचणी घेतली.
नळीच्या एका बाजूला लॅव्हेंडरचा सुगंध होता तर दुसरी बाजू गंधहीन होती. अप्रशिक्षित गटातील फुलपाखरे दोन्ही बाजूंना समान प्रमाणात गेली. परंतु, प्रशिक्षित फुलपाखरांनी लॅव्हेंडरच्या सुगंधापासून दूर जाणे पसंत केले. यावरून जोने हे सिद्ध केले की, कायापालटादरम्यान शरीर आणि मेंदूची पूर्ण पुनर्रचना होऊनही आठवणी कायम राहू शकतात.