

शांघाय : चीनमध्ये सापडलेली दहा लाख वर्षे जुनी मानवी कवटी आपल्या प्रजातीचा म्हणजेच होमो सेपियन्सचा उदय अंदाजित वेळेच्या सुमारे पाच लाख वर्षे आधी झाला असावा, असा दावा संशोधकांनी एका नवीन अभ्यासातून केला आहे. या अभ्यासानुसार, मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाचे मुख्य टप्पे पूर्णपणे बदलावे लागतील.
चीनमधील हुबेई प्रांतात सापडलेल्या या कवटीला ‘युनशियान 2’ असे नाव देण्यात आले आहे. ही कवटी सुमारे दहा लाख वर्षांपूर्वीची असल्याने, शास्त्रज्ञांनी पूर्वी ती होमो इरेक्टस या जुन्या पूर्वजाची मानली होती. कारण प्रगत मानवाचा उदय इतक्या लवकर झाला असेल, असे मानले जात नव्हते.
‘सायन्स’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन विश्लेषणात, फुदान विद्यापीठाचे प्रो. झिजुन नी आणि यूकेच्या नैसर्गिक इतिहास संग्रहालयाचे प्रो. ख्रिस स्ट्रिंगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कॉम्प्युटर मॉडेलिंगचा वापर करून कवटीचा मूळ आकार पुनर्संचयित (रिस्टोअर) केला. या विश्लेषणातून युनशियान 2 ही कवटी होमो लाँगी या प्रजातीची असल्याचे स्पष्ट झाले. जी होमो सेपियन्स आणि निअँडरथल यांच्या विकासाच्या स्तरावरची ‘बहीण प्रजाती’ (सिस्टर स्पेसिस) आहे, असे संशोधक सांगतात.
या नव्या निष्कर्षाचा अर्थ असा होतो की, होमो सेपियन्स, निअँडरथल आणि होमो लाँगी या तीनही मोठ्या मेंदूच्या मानवी प्रजाती दहा लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होत्या. पूर्वीच्या अंदाजानुसार या प्रजातींचे सहअस्तित्व फार कमी काळ होते, पण या नव्या कालक्रमानुसार, त्यांनी सुमारे 8 लाख वर्षे एकत्र वास्तव्य केले असावे. या काळात त्यांच्यात आंतर-प्रजनन (इंटर ब्रिडिंग) देखील झाले असण्याची शक्यता आहे. 8 लाख ते 1 लाख वर्षांपूर्वीचे अनेक मानवी जीवाश्म शास्त्रज्ञांना वर्गीकृत करणे कठीण जात होते, ज्यांना ‘डल इन द मिडल’ म्हटले जात होते.
आता या तीन प्रमुख प्रजातींचा लवकर उदय झाल्याने, हे अवर्गीकृत जीवाश्म त्यांच्या उप-गटांमध्ये समाविष्ट करणे शक्य झाले आहे. प्रो. स्ट्रिंगर यांच्या मते, जगात कुठेतरी दहा लाख वर्षे जुने होमो सेपियन्सचे जीवाश्म नक्कीच असतील, जे अजून सापडलेले नाहीत. केंब्रिज विद्यापीठाचे उत्क्रांतीवादी जनुकीयशास्त्रज्ञ डॉ. एलविन स्कॅली यांच्यासह इतर तज्ज्ञांनी या निष्कर्षांचे स्वागत केले असले तरी, त्यांनी या वेळेच्या अंदाजावर सहमती दर्शवलेली नाही. जीवाश्म आणि जनुकीय दोन्ही पुराव्यांमध्ये अनिश्चितता असल्याने, अधिक पुराव्यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.