

नवी दिल्ली : पृथ्वीपासून शेकडो किलोमीटर अंतरावर अंतराळात मुक्काम करणारे अंतराळवीर केवळ अंतराळ प्रवासाचा अनुभव घेत नाहीत, तर मानवी जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण प्रयोगही करत आहेत. मानवी शरीरावर गुरुत्वाकर्षणाचा अभाव असताना होणारे परिणाम, अंतराळात मानवी उतींची निर्मिती, प्रतिकूल परिस्थितीत वनस्पतींची वाढ आणि भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी आवश्यक तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर संशोधन सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार, सध्या एकूण १० जण अंतराळात आहेत. त्यापैकी सात जण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस), तर तीन जण चीनच्या तियांगाँग अंतराळ स्थानकावर आहेत. या संशोधनातून भविष्यात चंद्र आणि मंगळावर मानवाच्या दीर्घकालीन वास्तव्याचा मार्ग सुकर होण्याची अपेक्षा आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सामान्यतः सात अंतराळवीरांचा चमू कार्यरत असतो; मात्र नव्या चमूचे आगमन, जुन्या चमूचे प्रस्थान किंवा विशेष मोहिमांच्या काळात ही संख्या तात्पुरती ११ ते १४ पर्यंत जाऊ शकते. आयएसएस ही नासा, रशियाची रोस्कोसमॉस, युरोपियन स्पेस एजन्सी, जपानची अंतराळ संशोधन संस्था आणि कॅनडाची अंतराळ संस्था यांच्या सहकार्याने चालवली जाणारी बहुराष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळा आहे. पृथ्वीभोवती ताशी सुमारे २८ हजार किलोमीटर वेगाने फिरणारे हे स्थानक साधारण ९० मिनिटांत पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करते. नोव्हेंबर २००० पासून या स्थानकावर मानवाचा अखंड मुक्काम सुरू आहे. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात मानवी शरीर आणि वैज्ञानिक उपकरणांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी हे स्थानक महत्त्वाचे ठरले आहे.
चीनचे तियांगाँग हे स्वतंत्रपणे विकसित केलेले अंतराळस्थानक आहे. येथे सामान्यतः तीन अंतराळवीरांचा चमू कार्यरत असतो. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात जैविक प्रक्रिया, मानवी आरोग्य, पदार्थविज्ञान आणि विविध भौतिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. अंतराळातील परिस्थितीचा सजीव आणि निर्जीव घटकांवर होणारा परिणाम समजून घेणे, तसेच भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी तंत्रज्ञान विकसित करणे, हा या प्रयोगांचा मुख्य उद्देश आहे.
अंतराळात मानवी उतींची निर्मिती (बायोप्रिंटिंग)
बायोप्रिंटिंग या प्रक्रियेत जिवंत पेशी आणि जैविक घटकांचा वापर करून मानवी उतींसारख्या रचना तयार केल्या जातात. नासाचे अंतराळवीर मानवी स्टेम सेल्सच्या साहाय्याने रक्तवाहिन्यांच्या उतींसह जैविक रचना तयार करण्यासाठी विशेष उपकरणांवर प्रयोग करत आहेत. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात पेशींची वाढ आणि त्यांची रचना कशी बदलते, याचा अभ्यास केला जात आहे. यामुळे औषधांच्या चाचण्या, रोगांचे प्रारूप तयार करणे आणि व्यक्तिनिहाय उपचारपद्धती विकसित करण्यास मदत होऊ शकते.
सौरऊर्जानिर्मिती क्षमता वाढविण्याची मोहीम
आयएसएसवरील उपकरणे आणि संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता असते. त्यामुळे स्थानकाची सौरऊर्जानिर्मिती क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नासाचे अंतराळवीर अनिल मेनन आणि कॅनडाचे अंतराळवीर जोशुआ कुट्रिक हे नव्या प्रकारची गुंडाळता येणारी सौरऊर्जा पॅनेल्स बसविण्यासाठी अंतराळभ्रमण करणार आहेत. या मोहिमेत नवीन सौर पॅनेल्समुळे स्थानकाची वीजनिर्मिती क्षमता सुमारे ३० टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. सध्याची सुमारे १६० किलोवॅट क्षमता वाढून २१५ किलोवॅटपर्यंत पोहोचू शकते.
मानवी शरीरावर अंतराळ प्रवासाचे परिणाम
गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्यामुळे मानवी शरीरातील द्रवांचे वितरण, स्नायूंची कार्यक्षमता, रक्ताभिसरण आणि डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. दीर्घकाळ अंतराळात राहणाऱ्या अंतराळवीरांच्या आरोग्याचे नियमित परीक्षण करून या बदलांचा अभ्यास केला जात आहे. चंद्र आणि मंगळावरील दीर्घकालीन मोहिमांसाठी हे संशोधन महत्त्वाचे आहे.
अंतराळात अन्नधान्य पिकविण्याचे प्रयोग
दीर्घकालीन अंतराळ मोहिमांमध्ये पृथ्वीवरून सतत अन्नपुरवठा करणे शक्य नसते. त्यामुळे मर्यादित पाणी, जागा आणि इतर संसाधनांचा वापर करून अंतराळात वनस्पती कशा वाढवता येतील, यावर संशोधन सुरू आहे. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा वनस्पतींच्या वाढीवर होणारा परिणामही तपासला जात आहे.
वैद्यकीय उपकरणांची चाचणी
अंतराळात तातडीने रुग्णालयाची मदत मिळणे शक्य नसल्याने अंतराळवीरांसाठी पोर्टेबल वैद्यकीय उपकरणे विकसित केली जात आहेत. शरीरातील महत्त्वाच्या जैविक मोजमापांची नोंद घेणे, रक्त व इतर नमुन्यांचे विश्लेषण करणे आणि संभाव्य आरोग्य समस्या वेळीच ओळखणे यासाठी या उपकरणांचा उपयोग होऊ शकतो.