

जोहान्सबर्ग ः भयानक भूकंप आल्यानंतर अनेक इमारती कोसळून लोक ढिगार्याखाली अडकत असतात. अशा लोकांशी संपर्क साधणे किंवा त्यांचा ठावठिकाणा शोधणे हे कठीण बनलेले असते. ढिगार्याखाली अडकूनही जिवंत राहिलेल्या व मदतीची वाट पाहत असलेल्या अशा लोकांना शोधण्याचे काम आता उंदरांचे एक पथक करणार आहे. त्यासाठी आफ्रिकेतील वैज्ञानिक व 'अपोपो' नावाच्या एका एनजीओने उंदरांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. बॅकपॅक परिधान केलेल्या या उंदरांची रेस्क्यू टीम ढिगार्याखाली अडकलेल्या लोकांना शोधून त्यांना मदत करू शकते.
डॉ. डोना कीन यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचा प्रयोग केला जात आहे. आतापर्यंत सात उंदरांना अशाप्रकारचे ट्रेनिंग देण्यात आले आहे. केवळ दोनच आठवड्यांत या उंदरांनी सर्व काही वेगाने शिकून घेतले. हे उंदीर आफ्रिकेत आढळणार्या 'पाऊच्ड रॅटस्' प्रजातीचे आहेत. त्यांना 'हीरो रॅटस्' असे नाव देण्यात आले आहे. या उंदरांना ट्रेनिंग देणे तुलनेने सोपे असते व ते आपली कामगिरी चोख पार पाडतात. तसेच त्यांची गंध घेण्याची क्षमता म्हणजेच घाणेंद्रियेही तीक्ष्ण असतात. हे उंदीर सरासरी 6 ते 8 वर्षे जगतात आणि त्यांचे पालनपोषण करणे हे तुलनेने किफायतशीर असते.
अगदी छोट्याशा जागेतही ते सहज घुसू शकतात. तसेच अनेक आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ते सक्षम असतात. या कारणांमुळे त्यांची या कामगिरीसाठी निवड करण्यात आलेली आहे. डॉ. कीन यांनी सांगितले की या उंदरांच्या पाठीवरील बॅगेत मायक्रो फोन, व्हिडीओ डिव्हाईस आणि लोकेशन ट्रॅकर ठेवण्यात आले आहेत. त्याच्या मदतीने रेस्क्यू टीम ढिगार्याखाली अडकलेल्या लोकांना शोधून, त्यांच्याशी बातचित करून त्यांची स्थिती समजून घेऊ शकतात. सध्या या उंदरांना नकली ढिगार्यांमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. लवकरच त्यांना सातत्याने भूकंप होणार्या तुर्कीमध्ये पाठवले जाईल.