लंडन : जगभरात अनेक अनोखी बेटं पाहायला मिळतात. भारतात हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात असणार्या पराशर सरोवरातही एक अनोखे बेट आहे. हे गोलाकार बेट संपूर्ण सरोवरात तरंगत फिरत असते. असेच एक तरंगणारे व गोलाकार बेट अर्जेंटिनामध्येही आहे. त्याचे नाव ‘एल ओजो’ असे आहे.
अर्जेंटिनाच्या दलदलयुक्त डेल्टामधील हे एक निर्जन बेट आहे. पराशर सरोवरातील बेटाप्रमाणेच हे गोलाकार व तरंगणारे बेट आहे. आकाशातून पाहिल्यावर ते एखाद्या डोळ्यासारखे दिसते. एका डॉक्युमेंट्रीच्या शूटिंगवेळी 2016 मध्ये फिल्ममेकर्सचे या एल ओजोकडे लक्ष गेले. डायरेक्टर सर्गियो न्यूस्लिपर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या बेटावरून उड्डाण केले होते. त्यावेळी त्यांना डेल्टामधील कापलेल्या वनस्पतींदरम्यान हे बेट दिसले. हे बेट अगदी तंतोतंत गोलाकार आहे. काळ्या, पण पारदर्शक पाण्यात हे गोलाकार बेट तरंगत होते. धीम्या गतीने होत असलेल्या धूप प्रक्रियेने सरोवराचे काठ व या बेटाच्या कडा गुळगुळीत झाल्या आहेत. छायाचित्रात ते छोटे दिसत असले तरी त्याचा व्यास 118 मीटर आहे. हे बेट वनस्पतींनीच बनलेले आहे. सरोवरातील प्रवाहाप्रमाणे तेही फिरत असते व ते सरोवराच्या काठाला चिकटते. या निरंतर फिरण्याने सरोवरही रुंद झाले आहे. हे बेट उजव्या दिशेने फिरते असे निरीक्षण करण्यात आले आहे. हे बेट कधी जमिनीपासून वेगळे झाले याची माहिती नाही; मात्र सुमारे वीस वर्षांपूर्वी ते सॅटेलाईट इमेजमध्ये सर्वप्रथम पाहण्यात आले होते.