सारस बागेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाची सांगता गोंधळात झाली. कार्यक्रम संपल्यानंतर घरी परतणाऱ्या नागरिकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊन एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रम संपल्यानंतर लोक बाहेर पडत असताना एकमेकांना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये बाचाबाची सुरू झाली. या दरम्यान, भगव्या टोप्या परिधान केलेल्या काही व्यक्तींच्या जमावाने एका तरुणाला मारहाण केली. मारहाणीची दृश्ये समोर आली आहेत.
या कार्यक्रमासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गोंधळ आणि हाणामारी सुरू होताच पोलिसांनी तातडीने मध्यस्थी केली आणि जमावाला पांगवले. पोलिसांनी त्वरित कारवाई करत मारहाण करणाऱ्या आणि मारहाण झालेल्या अशा दोन्ही बाजूच्या लोकांना ताब्यात घेतले आहे. पहाटेपासून परिसरात फिरणाऱ्या काही व्यक्तींकडून हा वाद झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या शेवटी झालेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस पुढील तपास करत आहेत.