Maharashtra Weather Update: राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून तो सध्या तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पूर्ण ईशान्य भारत (North East) कव्हर केला असून, महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत पुढील ४ ते ५ दिवसांत तो पुढे सरकण्याची शक्यता आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून कधी सक्रिय होणार हे तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून राहील. सध्या राज्यात काही ठिकाणी केवळ वादळी पाऊस होत असल्याने, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी हवामान व कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करूनच पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.