दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर ओतूरजवळील अहिनवेवाडी फाटा येथे घडली. अचानक महामार्गावर अवतरलेल्या बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली: मात्र तरुणाने मोठ्या चपळाईने बिबट्याची झेप हुकवल्याने हा तरुण थोडक्यात बचावला असून तो जखमी झाला आहे. बुधवारी (दि. १२) सायंकाळी साडे सहाचे सुमारास अत्यंत रहदारी असलेल्या महामार्गावर ही घटना घडली. बाळू सीताराम डोके (वय ३४, रा कमलानगर आंबेगव्हाण) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ओतूर येथून जुन्नरकडे अहिल्यानगर-कल्याण महामार्गाने बाळू डोके हे आपल्या दुचाकीवरून जात होते. अहिनवेवाडी शिवारात ते आले असता अचानकपणे तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर भर रस्त्यातच हल्ला केला. यावेळी बाळू डोके हे खाली झुकले: मात्र खाली पडून ते काही अंतर घसरत गेल्याने दुचाकी त्यांच्या अंगावर आली व ते जखमी झाले. बिबट्याच्या हल्ल्यातून ते बचावले; मात्र दुचाकीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला, हाताला व पायाला जखमा झाल्या आहेत. यानंतर त्यांना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच ओतूर वनविभागाचे कर्मचारी सारिका बुट्टे, विश्वनाथ बेले यांनी आळेफाटा येऊन जखमी बाळू डोके यांची विचारपूस केली. बिबट्याचा या परिसरातील वावर हा आता नित्याचा झाला असून ग्रामस्थ व शेतकरी भयभीत वातावरणात वावरत आहेत.