मुंबई : मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत तसेच विरोधी पक्षातील नेत्यांवर जोरदार टीका केली. या पत्रकार परिषदेत आंदोलन, मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्यामागील राजकीय घडामोडींवर विविध दावे करण्यात आले.
त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला ‘सेटिंग आंदोलन’ संबोधत, हे आंदोलन राजकीय स्वरूपाचे असल्याचा आरोप केला. तसेच उपोषण मागे घेण्यामागे काही राजकीय चर्चा झाल्याचा दावा करत, पुढील काळात जरांगे यांना पुन्हा एखाद्या राजकीय किंवा सार्वजनिक व्यासपीठावर संधी मिळू शकते, असेही सूचित केले.
एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यावर टीका
पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या भूमिकेवरही टीका करण्यात आली. जरांगे यांच्या आंदोलनामुळे सरकारमधील काही नेत्यांवर राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं सदावर्ते बोलले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरही वक्तव्य
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनामुळे गणेशभक्तांना त्रास झाल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. मुंबईसारख्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरातील परिस्थितीवर आंदोलनाचा परिणाम होऊ शकतो, असेही सदावर्ते म्हटले. धार्मिक भावना आणि राजकारण यांचा संबंध जोडत भविष्यात अशा प्रकारचे राजकारण टाळावे, असे आवाहनही सदावर्ते यांनी केले.