जेव्हा जुगलबंदी रंगली, तेव्हा हृदयाला भिडली ! शिवकुमार शर्मांना निरोप देताना झाकीर हुसेन स्तब्ध
नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशातील प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकारांपैकी एक असलेले संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मंगळवार, १० मे रोजी त्यांच्या पाली हिल येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बुधवारी कुटुंबीय आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत पूर्ण शासकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी पंडित शिव कुमार यांचे जवळचे आणि साथीदार असलेले तबला वादक झाकीर हुसेन हे देखील उपस्थित होते, ते अतिशय असह्य दिसत होते, यादरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंडित शिवकुमार शर्मा यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी, असह्य झाकीर हुसेन भावनावश होऊन पाहत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पांढरा कुर्त्यामध्ये ओलसर डोळ्यांनी झाकीर स्तब्धपणे उभे राहून मित्राला अखेरचा निरोप देत असताना पाहून मनात काहून माजल्याशिवाय राहत नाही.
संयुक्ता चौधरींच्या ट्विटर पेजवरून फोटो शेअर करताना कॅप्शन दिले आहे, 'उस्ताद झाकीर हुसेन पंडित शिवकुमार शर्मा यांच्या अंत्यसंस्कारात, अनेक दशकांच्या मित्राला निरोप देताना. दोघांनी मिळून अनेक प्रसंगी रंगमंचावर जादू केली. यापेक्षा हृदयस्पर्शी चित्र कधीच पाहिले नाही.
या फोटोसोबतच हुसेन पंडित शिवकुमार यांच्या पार्थिवाला खांदा देत असल्याचे फोटोही चांगलेच व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून लोक सोशल मीडियावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
कोणी ते देशाचे खरे चित्र सांगत आहेत, कोणी धर्मनिरपेक्षतेचे उदाहरण सांगत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'धर्म कोणताही असो, त्याचा संगीताशी काहीही संबंध नाही. जेव्हा ट्यून हृदयाला भिडली, तेव्हा ती जुगलबंदीमध्ये बदलली'. दुसरीकडे, एका यूजरने रिप्लाय करताना लिहिले की, 'त्याला सोडायला तयार नाही… अगदी शेवटच्या क्षणीही….. हे शुद्ध प्रेम, आदर आणि बंधन आहे'.

