

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा रूपाभवानी मंदिराजवळ असलेल्या सिद्धेश्वर वुमन पॉलिटेक्निकलच्या सिध्देश्वर गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या विद्यार्थिनींना मंगळवारी (26 जुलै) जेवणातून विषबाधा झाली. या प्रकरणी खानावळ (मेस) चालवणार्या सुवर्णा राजू बबलादी, त्यांचा पती राजू बबलादी व गर्ल्स हॉस्टेलच्या व्यवस्थापिका (रेक्टर) संगीता लकशेट्टी या तिघांच्या विरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे सहायक महिला पोलीस निरीक्षक संजीवनी व्हट्टे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
सिद्धेश्वर गर्ल्स हॉस्टेल येथे खानावळ चालवली जाते. दि. 26 जुलै रोजी सायंकाळी येथील मुलींनी जेवण केले. त्यावेळी जेवणात आळ्या आढळून आल्या. मागील तीन-चार दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या मुलीच्या जेवणातील भातात अळ्या आढळून येत होत्या. याबाबत येथील मुलींनी तक्रार करूनसुध्दा व्यवस्थापिका व खानावळचालक यांनी दुर्लक्ष केले. मुलींना उलट्या, जुलाब, ताप, डोकेदुखी असा त्रास होऊ लागल्याने त्यांना शहरातील सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच भवानी पेठेत असलेल्या समर्थ सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करता दाखल केले.यावेळी उपचार घेत असलेल्या सर्व मुलींनी तक्रार करून सुध्दा याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात आले. खानावळ चालक यांनी जेवण बनवण्याच्या कामात हयगय निष्काळजीपणा केला. तसेच रात्रीचे शिल्लक राहिलेल्या अन्नाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कॉलेजमधील विषबाधा झालेल्या चौदापैकी नऊ विद्यार्थिनींना काल गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. उर्वरित पाच विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून त्यांनाही आज डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे सांगितले. श्री सिध्देश्वर गर्ल्स हॉस्टेल येथे वास्तव्यास असलेल्या या सर्व विद्यार्थिनींना अन्न किंवा त्यानंतर त्यांना उपचारासाठी एसटी बसस्थानकाजवळील सिध्देश्वर हॉस्पिटल आणि भवानी पेठेतील समर्थ हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.
श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटी व शिक्षण समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी रुग्णालयास भेट देऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थिनींच्या प्रकृतीची चौकशी करून त्यांना दिलासा दिला आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या विद्यार्थिनींच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होण्यासाठी देवस्थान शिक्षण संस्थेतील सर्व प्रमुख मंडळी प्रयत्नशील आहेत. काल गुरुवारी सिध्देश्वर हॉस्पिटल येथून पाच आणि समर्थ हॉस्पिटलमधून चार विद्यार्थिनींना घरी सोडण्यात आले.