अक्कलकोट : सततच्या पावसामुळे खरीप पिके पाण्याखाली

अक्कलकोट : सततच्या पावसामुळे खरीप पिके पाण्याखाली
Published on
Updated on

अक्कलकोट : पुढारी वृत्तसेवा अक्कलकोट तालुक्यात यंदा गेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीतून ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील लाखो हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. हातातोंडाला आलेली पिके करपणे, कुजणे आणि डोळ्यादेखत वाहून जात असल्यामुळे शेतकरी हताश झालेले आहेत. शासनाने तत्काळ पंचनामा करुन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

तालुका हा नेहमी अवर्षणग्रस्त तालुका म्हणून त्याची ओळख आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ्यात अतिवृष्टी व महापूर यामुळे शेतकरी हताश झालेले आहेत. तालुक्यातील शेतकरी कधी अवर्षणामुळे, तर कधी अतिवृष्टीमुळे आर्थिक कोंडीत सापडलेले आहेत. वारंवार हवामान खात्याच्या चुकीच्या वक्‍तव्यामुळे शेतकरी अवेळी चुकीच्या बियाण्यांची पेरणी करुन आर्थिक कोंडीत सापडतात. यंदा मान्सूनपूर्व पाऊस लवकर सुरू होईल, असे एका हवामान खात्याने वर्तवले, तर दुसर्‍या हवामान खात्याने ऑगस्ट महिन्यांपर्यंत पाऊस येणार नाही. तरी शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये, पेरणी योग्य पाऊस झाल्यावरच आपल्या शेतात पेरणी करावी, असे आवाहन केले होते. तरीही मशागत करुन जमीन तयार ठेवलेल्या तालुक्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी पेरणीची घाई केली आणि त्या शेतकर्‍यांचे पीकही जोमात आले. फुले, फळेही लागली.

यंदा शेतीचे उत्पादन चांगले होईल असे म्हणत असतानाच 2 ऑगस्टपासून सुरुवात झालेल्या पुष्य नक्षत्राच्या पावसाने अक्कलकोट तालुक्यात सर्वदूर मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतात पाणी साचून पिकांची वाढ खुंटून पिवळे पडणे आणि कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अक्कलकोट तालुक्यात 9 मंडलांमध्ये 136.6 मि.मी. पाऊस झाला आहे. मंडलनिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे : अक्कलकोट (3.4 मि.मी.), जेऊर (59.6), तडवळ (12.5), करजगी (74.6), दुधनी (11.1), मैंदर्गी (12.5), वागदरी (11), चपळगाव (3.4), किणी (25.5) असा एकूण सरासरी 23.7 मि.म. इतका पाऊस पडला आहे. यंदा तालुक्यात झालेल्या खरीप हंगामामध्ये झालेली पेरणी याप्रमाणे – भात (2 हेक्टर), खरीप ज्वारी (15.80), बाजरी (15), मका (553), एकूण तृणधान्ये (665.80), तूर (12894), उडीद (13095), मूग (1881), मटकी (12), हुलगा (9) असे एकूण कडधान्ये 27891, तर भुईमूग (988), सूर्यफुल (52), सोयाबीन (5611), कारळे (3) असे एकूण गळीत धान्य 6661, कापूस (52), अशी एकूण खरीप हंगामात 35 हजार 269.80 हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे.

अक्कलकोट तालुक्यात उडीद, मूग, सोयाबीन, सूर्यफूल या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात झालेली असून, सतत पडणार्‍या पावसामुळे पिकांची वाढ खुंटलेली आहे. पिके पिवळी पडून कुजून जात आहेत. उर्वरित पिकांना फुले, फळे अत्यंत कमी प्रमाणात लागल्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात यंदा मोठ्या प्रमाणात तूट होणार आहे, हे मात्र नक्की. शासनाने शेतकर्‍यांना भरीव आर्थिक मदत करावी.
– कृषितज्ज्ञ आप्पासाहेब पाटील, चपळगाव

अक्ककलोट तालुका हा नेहमीच अवर्षणग्रस्त असतो; परंतु गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे हाता-तोंडाला आलेली पिके वाया जात असून कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळामुळे शेतकर्‍यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. केंद्र व राज्य सरकारने एकरी तीस हजार रुपये पीक विमा मंजूर करुन आर्थिक मदत करावी.

– शरणप्पा बिराजदार, ममदाबाद, शेतकरी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news