सोलापूर : संस्था टिकविण्यासाठी समंजसपणाची गरज

संस्था टिकविण्यासाठी समंजसपणाची गरज
संस्था टिकविण्यासाठी समंजसपणाची गरज
Published on
Updated on

सोलापूर ः वेणुगोपाळ गाडी एकेकाळी पूर्व भागात असलेल्या सूत-वस्त्रोद्योगच्या संस्थांचा बोलबाला होता. याआधारे येथे सोन्याचा धूर निघायचा. मात्र, अंतर्गत मतभेद व अन्य कारणांमुळे सर्व संस्था लयास गेल्या. आता पूर्व भागात मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या रुपात केवळ एकच संस्था टिकली आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही संस्था टिकविण्यासाठी मतभेद, अहंभाव बाजूला ठेऊस समंजसपणा दाखविण्याची नितांत गरज आहे.

सहकार क्षेत्राच्या माध्यमातून पूर्व भागात शेकडो संस्थांचे जाळे विणले होते. यशवंत-सोलापूर-शारदा या सूत गिरण्या, कापडावर प्रक्रिया करणारी व्हिव्हको प्रोसेस, हातमाग उत्पादनांना चालना देणारी वेम्कोटेक्स यासह जिल्हा औद्योगिक बँक, इंदिरा महिला बँक, नागरी बँक, हातमाग-यंत्रमाग संस्था या पूर्व भागाचे वैभव समजले जायच्या. या सहकार चळवळीच्या जोरावर पूर्व भागाने आपले स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण केले. महापौरच नव्हे आमदार, खासदार, राज्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. औद्योगिक बँक राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू होता. महापौर कोणाला करायचे याचा फैसला तिथे व्हायचा. असे वैभवशाली चित्र समाजअंतर्गत मतभेद, वैयक्‍तिक हेवेदावे, गटातटाच्या राजकारणामुळे लोप पावण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता एकेक संस्था बंद पडण्यास सुरुवात झाली आणि आज सर्व संस्था इतिहासजमा होऊन आज केवळ मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या रुपात एकमेव सहकारी संस्था पूर्व भागात शिल्लक राहिली आहे.

सध्या या रुग्णालयाची निवडणूक लागली आहे. रुग्णालयाची निवडणूक अविरोध करण्याचा पायंडा आहे. मात्र गतवेळी अविरोध करण्याच्या प्रयत्नास यश आले नाही. समाजअध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सत्ताधार्‍यांविरोधात पॅनेल उभारण्यात आले, मात्र त्यात विरोधी पॅनलचाच धुव्वा उडाला. या रुग्णालयाच्या सध्या भरभराट सुरू आहे. गोरगरिबांना येथे रास्त दरात उपचार मिळतात. शहरातील नामवंत रुग्णालय म्हणून या रुग्णालयाचा नावलौकिक आहे.

यंदा निवडणुकीसाठी सुमारे 200 जणांनी अर्ज भरला आहे. सध्या अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत वैयक्तिक मतभेद, हेवेदावे तसेच राजकारण आणून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होत आहे. जे निश्‍चितपणे या संस्थेसाठी धोकादायक आहे. पूर्व भागाचे वैभव असणारी ही एकमेव सहकारी संस्था जिवंत ठेवण्यासाठी अहंभाव, मतभेद तसेच गटतट बाजूला सारण्याची गरज आहे.
असे झाल्यास निवडणूक अविरोध होण्यास मदत होणार आहे. अन्यथा या संस्थेला थोडासा जरी धक्का लागला तर त्याची किंमत भावी काळात सार्‍या पूर्वभागाला मोजण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.

बिविरोध करण्यासाठी गुरुवारी बैठक
या रुग्णालयाची निवडणूक अविरोध करण्यासाठी सत्ताधारी गटाने गुरुवारी (दि. 30) सकाळी साडेदहा वाजता दाजी पेठेतील व्यंकटेश्‍वर सांस्कृतिक भवनात उमेदवारी अर्ज भरलेल्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सर्वांचा कल जाणून घेण्याबरोबरच निवडणूक अविरोध करणे संस्थेसाठी कसे हितावह आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न श्रेष्ठी व पदाधिकारी करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news