वेळापूर : पुढारी वृत्तसेवा श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा बुधवार, 6 जुलै रोजी वेळापूर मुक्कामी येत आहे. याबाबत वेळापूर ग्रामपंचायत, प्रशासनाच्यावतीने सर्व प्रकारची कामे पूर्णत्वाकडे असल्याची माहिती सरपंच विमल जानकर यांनी दिली.मागील दोन वर्षे कोरोनामुळे पालखी सोहळा होऊ शकला नाही. मात्र, यावर्षी पालखी सोहळा मोठ्या प्रमाणात होत आहे. यासाठी वेळापूर ग्रामपंचायतीच्यातीने संपूर्ण वेळापूर शहरातील गटारी बंदिस्त केल्या आहेत. विसावा व पालखीतळ येथे ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छता व सपाटीकरण व मुरुमीकरण करण्यात आले. गावातील अंतर्गत रस्त्यांचे, पालखीतळ परिसर, पालखीमार्ग दोन्ही बाजूंची काटेरी झुडुपे जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली आहेत.
गावातून धूर व जंतुनाशक फवारणी पालखी सोहळ्याअगोदर तीन दिवस करण्यात येणार आहे. वेळापूर सांगोला रोडवरील दहा विहिरींतून अंदाजे 700 टँकरने पिण्याच्या पाण्यासाठी सोय केली आहे. पालखी मार्गालगतच्या विहिरींचे क्लारोनेशन करण्यात येत आहे. पालखीतळाजवळ 15 स्टँड पोस्ट, दोन पाण्याचा टाकीने पाणीपुरवठा केला जाणार आहे. टँकर भरण्याची ठिकाणे व सर्व रस्ते मुरुमीकरण करून याठिकाणी दिव्यांची सोय केली जात आहे. स्वच्छतेसाठी गावातील 16 सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व स्वच्छता करण्यात आली आहे. गावात 1000 मोबाईल टॉयलेट बाराठिकाणी ठेवण्यात येणार असून याठिकाणी विजेची व पाण्याची सोय करण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी पालखीतळालगत दोन अग्निशमन ठेवण्यात येणार आहे, तर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. वेळापूर पालखीतळ सपाटीकरण करून पालखी कट्टा परिसरातील लहान-मोठे गोटे वेचून, मुरूम टाकून सपाटीकरण करुन घेण्यात आले.
पालखीवरील तळ हातपंपासमोर शोषखड्डा करून, दुरुस्ती करून पाईप टाकण्यात आला आहे. पालखीतळ परिसरातील दक्षिण पूर्व व उत्तर बाजूला असणारी काटेरी झुडुपे जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली आहेत. पालखीतळ ट्रॅक्टर फळीच्या साह्याने सपाटीकरण करण्यात आले आहे. मुख्य पालखीतळ येथील सात मोठे हायमास्ट पोलवरील सर्व दिवे कार्यन्वित केले आहेत. पालखीतळावरील वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची सोय करण्यात येणार आहे. वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने ठिकठिकाणी सर्व्हे करून डास उत्पन्न होऊ नयेत पावडर फवारण्याचे काम वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब ओव्हाळ व सर्व कर्मचारी यांचे चालू आहे. भाविकांना सेवा पुरवण्यासाठी उपसरपंच जावेद मुलाणी, ग्रामविकास अधिकारी दीपक गोरे, ग्रा.पं सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
वेळापूर ग्रामपंचायत वैष्णवांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णपणे सक्षम राहणार आहे. याकाळात ग्रामपंचायत, प्रशासन व ग्रामस्थ या सर्वांनी दक्ष राहून हा पालखी सोहळा माऊलींच्या जयघोषात पार पाडण्याचे आवाहन सरपंच विमल जानकर यांनी केले आहे.