श्री तुळजाभवानी मंदिर भ्रष्टाचार प्रकरण : दोषींवर 5 वर्षांनंतरही कारवाई का नाही?

तुळजाभवानी मंदिर
तुळजाभवानी मंदिर
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा श्री तुळजाभवानी देवस्थानात 1991 ते 2009 या कालावधीत सिंहासन दानपेटी लिलावात 8 कोटी
45 लाख 97 हजार रुपयांचा अपहार झाला. याप्रकरणी दोषी असलेल्यांवर पाच वर्षांनंतरही कारवाई का नाही? अशी नोटीस उच्च न्यायालयाने गृह आणि पोलिस विभागाला पाठवली आहे. श्री तुळजाभवानी देवस्थान भ्रष्टाचार प्रकरणी 9 लिलावदार, 5 तहसीलदार, 1 लेखापरीक्षक आणि 1 धार्मिक सहव्यवस्थापक यांच्यावर विविध कलमांतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस राज्य गुन्हे अन्वेषण खात्याने चौकशी अहवालाद्वारे महाराष्ट्र शासनाला केली. त्याला पाच वर्षे उलटली, तरी दोषींवर अद्यापही कारवाई झालेली नाही.

या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने पाच वर्षे झाली तरी सीआयडीच्या अहवालानुसार दोषींवर गुन्हे का दाखल करण्यात आले नाहीत? पाच वर्षे गुन्हे दाखल करण्यासाठी पुरेशी नाहीत का?, असे प्रश्‍न महाराष्ट्र शासनाला विचारले. या संदर्भात न्यायालयाने महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, अतिरिक्‍त मुख्य गृह सचिव, पोलिस महासंचालक, तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक, संभाजीनगर आणि पोलिस अधीक्षक, धाराशीव यांना 22 ऑगस्ट 2022 पर्यंत म्हणणे मांडण्याची नोटीस पाठवली आहे. या संदर्भात हिंदू जनजागृती समितीने हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्‍ता सुरेश कुलकर्णी, अधिवक्‍ता उमेश भडगांवकर यांच्यामार्फत फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती देशपांडे यांनी उपरोक्‍त आदेश दिले.

समितीच्या फौजदारी रिट याचिकेला जनहित याचिकेत रुपांतर करण्याची अनुमती दिली आहे. 2011 मध्ये महाराष्ट्र शासनाने श्री तुळजापूर मंदिर  घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते; मात्र यात अनेक उच्चपस्थ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सहभागी असल्याने चौकशी पूर्ण होत नव्हती. त्यामुळे समितीने 2015 मध्ये संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका (क्र. 96/2015) दाखल केली होती. 20 सप्टेंबर 2017 या दिवशी अपर मुख्य सचिव, गृह विभाग, महाराष्ट्र राज्य यांना चौकशी अहवाल सादर करण्यात आला; मात्र तो अहवाल विधीमंडळात सार्वजनिक न करता दडवून ठेवण्यात आला. या संदर्भात दुसरी याचिका दाखल केल्यावर संभाजीनगर खंडपिठाचे न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती एस. जी. मेहरे यांनी 22 एप्रिल 2022 या दिवशी सदर अहवालाची प्रत हिंदु जनजागृती समितीला उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारला दिले. अहवाल सादर केला पण दोषींवर कारवाई झाली नव्हती. अखेर तिसर्‍या रिट याचिकेवर न्यायालयाने दोषींवर कारवाई का केली नाही, याबाबत म्हणणे मांडण्याची नोटीस लागू केल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकान्वये दिली.

आता तरी कारवाई होणार का..?

चौकशी अहवालात 16 शासकीय अधिकारी आणि लिलावधारक यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली. त्या कालावधीत मंदिराचे विश्वस्त असणारे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर विभागीय स्तरावर कारवाई करण्याची शिफासर केली होती; मात्र पाच वर्षे झाली, तरी यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अनेकदा निवेदन देऊन आणि आंदोलन करूनही शासनाने काही कार्यवाही केली नाही. त्यामुळे समितीला तिसर्‍यांदा न्यायालयात याचिका दाखल करावी लागली. आता तरी कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news