

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा पावसाळ्याला सुरुवात होताच शहरात डेंग्यू-मलेरियाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या शहरात डेंग्यूसदृश 3 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू-मलेरियाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून महापालिकेतर्फे शहरभरात फवारणी-धुरावणीबरोबरच अन्य प्रतिबंधात्मक उपाय राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी दिली.
मनपातर्फे डेंग्यू, मलेरियाबाबत एप्रिलमध्ये मान्सूनपूर्व जनजागृती करण्यात आली. यामध्ये शाळांमधील विद्यार्थी तसेच झोपडपट्टीवासीयांचे प्रबोधन करण्यात आले. आता मान्सून सुरू झाल्यावर शहरभरात फवारणी-धुरावणीची मोहीम राबविण्यात येत आहे. शहरात डेंग्यू-मलेरियाबाबत सर्व्हे होणार असून घरोघरी जाऊन आरोग्य विभागाचे कर्मचारी कंटेनर तपासणी करणार आहेत. ज्यांच्या घरी डासांच्या अळ्या आढळतील अशांना अळ्यांचा नाश करण्यासाठी रसायन देण्यात येणार आहे. ज्या घरात डेंग्यू-मलेरियासदृृश रुग्ण आढळतील अशांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. प्रादुर्भाव असलेल्या भागावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
नागरिकांना खबरदारी घेण्याचे मनपाचे आवाहन
मलेरिया-डेंग्यूचा आजार होऊ नये म्हणून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. डास चावू नये म्हणून अंगभर कपडे घालावेत, मच्छर अगरबत्ती, मच्छरदाणीचा वापर करावा. ताप आल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी केले आहे.