पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर अभिजित पाटील यांनी वर्चस्व मिळवले तर व्हा. चेअरमनपदी प्रेमलता रोंगे यांची निवड झाली आहे. व्हा. चेअरमनपदी महिलेची निवड होण्याची ही विठ्ठल कारखान्याच्या इतिहासातील पहिलीच घटना ठरली आहे. गुरुवार दि. 21 जुलै रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हा. चेअरमनपदाच्या निवडीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नागेश पाटील यांनी काम पाहिले. चेअरमनपदासाठी अभिजित धनंजय पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला तर व्हा. चेअरमन पदासाठी देखील प्रेमलता बब्रुवाहन रोंगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील यांनी जाहीर केले.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरु व्हावा, शेतकर्यांचा राजवाडा पुन्हा सुरु व्हावा, गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकर्यांना मिळावेत, कामगारांचे पगार मिळावेत, म्हणून डिव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी स्वतंत्र पॅनल उभा करुन डॉ. बी.पी. रोंगे, व शेतकरी संघटना यांना बरोबर घेवून सत्ताही काबीज केली. शेतकरी संघटना व सभासद यांनी केलेल्या सहकार्यामुळेच विजय मिळवणे शक्य झाले असल्याचे नूतन चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले तसेच आज चेअरमनपदी निवड झाली असल्याने सहीचा अधिकार आला आहे. त्यामुळे 500 कर्मचार्यांना कामावर रुजू करुन घेण्यात आलेले आहे. निवडणुकीत जी काही आश्वासने दिली होती. त्याची पूर्तता करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही नूतन चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले.