सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) 9 प्रभागांत निवडणूक लढविणार आहे. शहर कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगत पक्षाशी गद्दारी करणार्यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशाराही प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी दिला. शहराध्यक्ष अतुल नागटिळक यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. शहर उत्तर, मध्य व दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील 9 प्रभागांत उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
कार्यकर्त्यांचे वेगवेगळे सूर
आंबेडकर चळवळीतील सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी सूचना याप्रसंगी काही कार्यकत्यांनी केली. काहींनी युतीमधील मित्रपक्षांशी चर्चा करून भूमिका घ्यावी, त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील पक्षाशीदेखील चर्चा करण्यात यावी, असे विचार मांडले. स्वबळावर निवडणुक लढविण्याचा सूरही काही जणांनी आळविला. शेवटी याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, असा ठराव मंजूर करण्यात आला.
सावध राहण्याचा दिला सल्ला
यावेळी राजाभाऊ सरवदे यांनी पक्षामध्ये निवडणुक काळामध्ये फूट पाडणार्या कार्यकर्त्यांपासून सदस्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला.
निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार राजाभाऊ सरवदे यांना देण्यात यावेत, असा प्रस्ताव राज्याचे उपाध्यक्ष के. डी. कांबळे मांडला. त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.