

मोहोळ : पुढारी वृत्तसेवा सत्ता बदलानंतर राज्यात शिवसेनेच्या अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. मोहोळ शहरासह तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी थेट मुंबई येथे 'मातोश्री' गाठत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेशी आम्ही एकनिष्ठ असल्याची ग्वाही दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना पक्षवाढीसाठी मार्गदर्शक सूचना केल्या.
यावेळी 'मातोश्री' येथे शिवसेना नेते अनिल परब, प्रवक्ते नितीन बानगुडे-पाटील, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये शिवसेना पक्षवाढीसाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन व सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या. मोहोळ शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये व तालुक्यामध्ये 'गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक' या प्रयोजना अंतर्गत मोहोळ तालुक्यातील तमाम शिवसैनिक व पदाधिकार्यांना बरोबर घेऊन सभासद नोंदणी अभियान संपूर्ण शहर व तालुक्यात राबवण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक (उच्चांकी) सभासद नोंदणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी शिवसेना शहरप्रमुख विक्रम देशमुख यांनी यावेळी दिली. या बैठकीस बाळासाहेब वाघमोडे, सिद्धेश्वर म्हमाणे, लिंगराज होनमाने, प्रकाश पारवे, कय्यूम शेख, विनोद देशमुख, लक्ष्मण विभूते, हणमंत खळसोडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.