भोंदूबाबा अब्बास बागवानच्या घरातून अघोरी विद्येचे साहित्य जप्‍त

भोंदूबाबा
भोंदूबाबा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील 9 जणांच्या हत्येत अटकेत असलेला सोलापुरातील मांत्रिक अब्बास बागवान याच्या सोलापुरातील घराची झडती सांगलीचे पोलिस उपअधीक्षक अशोक विरकरसह पथकाने घेतली. अघोरी विद्येचे साहित्य जप्त केले. मांत्रिक अब्बास बागवान याचे सोलापुरात मुस्लिम पाच्छा पेठेत अपार्टमेंटमध्ये घर आहे. सांगली पोलिसांच्या पथकाने बागवान याच्या घराची संपूर्ण झडती घेतली असता काळी विद्या व काळ्या जादूचे साहित्य सापडले. ते सर्व साहित्य जप्त करुन पथक सांगलीला रवाना झाले.

गुप्तधनाचे आमिष दाखवून अब्बास बागवान व धीरज सुरवसे यांनी म्हैसाळ (जि. सांगली) येथील व्हनमोरे कुटुंबातील 9 जणांची चहामध्ये विष घालून हत्या केली होती. असा गुन्हा मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. दोन्ही आरोपींना 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. अब्बास बागवान हा अघोरी विद्येत पारंगत होता, अशी माहिती सांगली पोलिसांना त्याच्या शेजारी राहणार्‍यांनी दिली होती. बागवान हा अमावास्या व पोर्णिमेला अघोरी कृत्य करत होता. याबाबत त्याच्या घरातील इतर सदस्यांना व नातेवाईकांना याची माहिती होती. अब्बास बागवान हा मंत्रतंत्र पठण करून अघोरी कृत्ये करण्यास सांगत होता.

सांगली पोलिसांनी अब्बास बागवान याच्या घरातून अघोरी विद्येचे साहित्य, जडीबुटी, औषधी वनस्पती, लाकडी दांडके, असे साहित्य जप्त केले. अब्बास बागवान याला सांगली पोलिसांनी अटक केल्यापासून त्याची पत्नी व मुले गायब आहेत. सोलापूर पोलिसांना कारवाईची माहिती नाही. सोलापूरच्या अब्बास बागवान व धीरज सुरवसे या दोघांना अटक केली होती. त्यावेळी दोघांना सोलापुरात आणल्यावर याची सोलापूरच्या पोलिसांनी माहिती नव्हती. शुक्रवारी सांगली पोलिस पुन्हा सोलापुरात आले. याचीही माहिती नव्हती, असे जेलरोड पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news