सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रस्त्यांची कामे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. आता नव्याने बाजार समितीच्या मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज खोदण्याचे काम सुरू झाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. भुसार बाजारातील ड्रेनेजचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. आता भुसार बाजारातील अंतर्गत खोदकाम करून ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. भुसारमधील मुख्य एक पदरी रस्ता पूर्ण करण्यात आला आहे.
दुसर्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र अंतर्गत रस्त्यावरील डे्रनेजलाईनचे काम सुरू असल्याने चारचाकी वाहनांना त्रास होत आहे. विशेषतः बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर सध्या ड्रेनेजचे काम सुरू करण्यात आले आहे. ड्रेनेजचे काम सुरू झाल्यानंतर सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण रस्ता पूर्ण होईपर्यंत वाहतुकीची समस्या निर्माण होणार आहे.
सकाळच्या सत्रात या मुख्य रस्त्यापासून भुसार, कांदा, फळे, फुले आदी ठिकाणी शेतकर्यांचा शेतमाल घेऊन जाण्यास अडचणी निर्माण होतात. सध्या पावसाळा सुरू झाल्याने या मुख्य रस्त्यावरून जाताना शेतकर्यांना जीव मुठीत धरुन जावे लागत आहे. त्यामुळे हे काम वेगाने सुरू करण्याची मागणी केली जात आहे. पावसाळा झाल्यानंतर शेतमालाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी रस्ते पूर्ण होणे गरजेचे आहे.