सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा पावसाळयात दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिण्याचा पाणीपुरवठा करणार्या जलस्त्रोतील पाण्याच्या नुमने तपासणी करण्याची मोहीम जिल्हा परिषद प्रशासनाने हाती घेतली आहे. यासाठी ग्रामपंचायतींना आवश्यक सूचना जिल्हा परिषदेकडून देण्यात आल्या आहेत. पावसाळयात उद्भवणार्या जलजन्य साथरोगांच्या उद्रेकाबाबत दक्षता घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील पिण्याच्या पाण्याचे नियमित शुद्धीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामपंचायतींना केले आहे.
पावसाळ्यात दूषित पाणी वाहून जात असल्याने ग्रामीण भागात साथरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. अशापरिस्थितीत पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून पुरवठा होणार्या पिण्याच्या पाण्यावर योग्य शुध्दीकरण प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक असते. पाण्याचे नियमित शुध्दीकरण व निर्जंतुकीकरण न करता पाणीपुरवठा झाल्यास साथरोगांचा प्रादुर्भाव होऊन साथीच्या रोगांचा उद्रेक होण्याची शक्यता असते. ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात कोणत्याही साथीचा उद्रेक होऊ नये, याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी व पुढील उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही ग्रामपंचायतींना सांगण्यात आले आहे.
गावात योग्य पध्दतीने नियमित शुध्दीकरण प्रक्रिया करून पाणीपुरवठा करण्यात यावा. जलस्त्रोतांजवळचा व जलवाहिन्यांजवळचा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. पाणीपुरवठा यंत्रणांची वेळेवर व सुयोग्य देखभाल ठेवण्यात यावी. गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व उपअभियंता (ग्रा.पा.पु.) यांनी दूषित पाणी नमुन्याबाबतचा आढावा याबाबत आवश्यक ती उपाययोजना करून याबाबतचा अहवाल जिल्हा स्तरावर सादर करणे गरजेचे असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सांगितले.
पाणी गुणवत्ता सनियंत्रणातील त्रुटी दूर करण्यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने पावसाळ्यात पिण्याचे पाणी सुरक्षित व निर्जंतुक होण्यासाठी काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत स्तरावर 33 टक्के क्लोरीन असलेली ब्लिचिंग पावडर तीन महिने पुरेल एवढ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे. पिण्याच्यापाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी त्वरित करून घ्यावी, अशा सूचना ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी ग्रामसेवकांना दिले आहेत.पाण्याबाबत जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन ग्रामसेवकांनी करावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.