

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा : नवर्याला मारहाण करून पळवून लावून विवाहित महिलेवर सख्ख्या तिघा भावांनी अत्याचार केल्याचा प्रकार 28 मे रोजी सकाळी आठ वाजता करमाळा तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी 28 वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. करमाळा पोलिसांत 17 जून रोजी गुन्हा दाखल झाला आहे. त्या विवाहित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, अमोल लाला काळे, भैया लाला काळे, किसन लाला काळे हे तीघेजण दारू पिऊन 28 मे रोजी सकाळी आठ वाजता घरात शिरले आणि नवर्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी सोडविण्यास गेले असता आरोपींनी मला मारहाण करून अमोल लाला काळे याने अत्याचार केला. आरोपीच्या तावडीतून सुटून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याने माझ्या डोक्यात तलवारीने मारले. डोक्यातून रक्त वाहू लागले, तरीही आरोपी भैया आणि किसन या दोघांनीही अत्याचार करून हाताने पायाने मारहाण केली. यावेळी माझा नवरा मारहाणीच्या भीतीने बाहेर पळून गेला. आरोपी अमोल याने तू आमच्याविरूध्द पोलिसांत गेलीस तर तुम्हा दोघांनाही जीवे मारू, अशी धमकी दिली. तसेच घरावरील पत्रे व घरातील सामान घेऊन निघून गेले. त्यानंतर त्याच दिवशी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास परत आरोपींनी पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्यावर मी सतत बळजबरीने अत्याचार करीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.