

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार, चेन्नई सुपर किंगचे कर्णधार, लेफ्टनंट कर्नल एम.एस. धोनी यांचा 7 जुलै रोजी 41 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापुरातील प्रा. नागराज खराडे यांच्या मेसा ग्रुपच्या वतीने आई किंवा वडील किंवा दोघेही नसलेल्या आणि दहावीनंतरचे शिक्षण घेत असलेल्या 41 विद्यार्थिनींसाठी 41 दिवसीय मोफत इंग्रजी संभाषण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभिनव उपक्रमाची सुरुवात महेंद्रसिंग धोनी यांच्या वाढदिवशी म्हणजेच 7 जुलै रोजी होणार असून पुढील 41 दिवस हा उपक्रम चालणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आणि करिअरसाठी महत्त्वाचे असलेल्या इंग्रजी संभाषण कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी संपर्क साधावा. या उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. नागराज खराडे यांनी केले आहे.