सोलापूर : पुढारी वृत्तसेवा दोन तीन दिवसापासून सोलापूर शहर व जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर काही गावातील ओढ्यांना पाणी आल्याने पुल पाण्याखाली गेले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांवचा काही काळ संपर्क तुटला होता. या पावसामुळे शेती पीकाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या 24 तासात विक्रमी 37.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून पहाटे पर्यंत विजांच्या कडकडासह जोरदार झालेल्या पावसामुळे रानातून पाणी वाहू लागल्याने शेतातील ओढे नाले तुडुब भरुन वाहत होते. शेती बांधाच्या पोटात पाणी साचले. अनेक गावांत गाव ओढ्याना पाणी
आले. हवामान खात्याने शहर व जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार सोमवार पासूनच पावसाला कमी अधिक प्रमाणात सुरुवात झाली. बुधवार आणि गुरुवारी या पावसाने जोरदार हजेरी लावली.
जिल्ह्यताील बार्शी, अक्कलकेाट, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. दक्षिण तालुक्यातील कासेगावचा पाणीपुरवठा अवलंबून असलेला तलाव पाण्याने पूर्णपणे भरला असून त्याचा सांडवा सुटला आहे. त्यामुळे ओढ्याला प्रमाणापेक्षा अधिक पाणी आल्याने पूलावरून पाणी वाहत आहे. गेल्या 40 वर्षापूर्वीचा जूना पूल पाडून नव्याने बांधण्यात आला होता. मात्र, पुलाचे स्ट्रक्चर तुटल्याने खड्डा कायम राहिला. त्यामुळे नव्याने बांधलेल्या पुलाचा काहीच उपयोग झाला नाही.त्यामुळे पावसाचे पाणी लवकर ओसरणार नसल्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
कासेगाव येथे या ओढ्यावर नुकताच पुल बांधण्यात आला आहे. मात्र पुल चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आला आहे. या पुलाची अपेक्षीत उंची वाढविण्यात आलेली नाही.त्यामुळे नव्याने बांधलेला पुल ही पाण्याखाली गेला त्यामुळे या पुलाचा खर्च पूर्णपणे पाण्यात गेल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल. हे काम चुकीचे झाले असून या पुलाच्या कामाची चौकशी करण्याची मागणीही कासेगावच्या ग्रामस्थांनी केली आहे.