तब्बल 10 वर्षांनंतर सोलापुरात रिक्षा भाडेवाढ

File Photo
File Photo

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा ऑटोरिक्षांच्या भाडेवाढीचा निर्णय तब्बल दहा वर्षांनंतर झाला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी शनिवारी त्यास मान्यता दिली. त्यानुसार पहिल्या दीड किलो मीटरसाठी 23 रुपये आणि त्यापुढील प्रत्येक एक किलोमीटरसाठी प्रवाशांना 15 रुपये मोजावे लागतील. सोमवारपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एक रिक्षाचालक झाल्याने प्रशासनाने रिक्षाचालकांच्या व्यथा समजून घेतल्यानेच हा निर्णय झाल्याची चर्चा रिक्षाचालकांमध्ये सुरू आहे. पेट्रोल व सीएनजी गॅसची दरवाढ, रिक्षांचा वाढलेला विमा हप्ता, मोटार वाहन करातील वाढ अशा विविध अडचणी असतानाही रिक्षाचालक जुन्याच पध्दतीने भाडे घेऊन प्रवाशांना सेवा देत होते. अनेक वर्षांपासून रिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करुन सोलापूर आरटीओ कार्यालयाने भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी साधारणत: 2012 मध्ये रिक्षांचे भाडे वाढवले होते. त्यावेळी 55 ते 60 रुपये प्रतिलिटर डिझेलचा दर होता. सध्या डिझेल 100 रुपयांवर गेले आहे.

महापालिकेचा परिवहन उपक्रम
मोडकळीस आल्यानंतर शहरतील खासगी रिक्षांनी प्रवाशांची अहोरात्र सेवा केली. त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
उपप्रादेशिक परिवहन सोलापूर कार्यालयाने तीन आसनी पेट्रोल इंधन किंवा सीएनजी वापरणार्‍या ऑटोरिक्षांसाठी या सुधारित भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांच्या बैठकीत भाडेवाढीचा निर्णय झाला.

रिक्षाचालकांच्या अडचणी जाणून घेऊन प्रवासी भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून त्याची अंमलबजावणी सुरु होईल. पण, कोणत्याही रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे घेऊ नये; अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
– अर्चना गायकवाड,
प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

अनेक वर्षांपासून रिक्षा संघटनेच्यावतीने भाडेवाढीची मागणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे केली जात होती. दहा वर्षांनी आमच्या मागणीला यश मिळाले असून भाडेवाढीतून आरटीओने रिक्षाचालकांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे.
– महिपती पवार, शहराध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा सेल, सोलापूर

… तर 40 दिवसांसाठी परवाना निलंबित
ऑटोरिक्षांमधील मीटरचे कॅलिब्रेशन (पुन्हा प्रमाणीकरण) केले जाणार आहे. ते काम मुदतीत न केल्यास प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी संबंधित रिक्षाचा परवाना एक दिवसासाठी निलंबित केला जाणार आहे. मीटर कॅलिब्रेशनसाठी 90 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पण, मुदतीत कॅलिब्रेशन करुन न घेतल्यास किमान सात दिवस ते जास्तीत जास्त 40 दिवसांसाठी त्या रिक्षाचा परवाना निलंबित होईल, असा इशारा आरटीओ अधिकार्‍यांनी दिला आहे.

रिक्षाचालकांना सूचना ः
महापालिका क्षेत्रातील रिक्षांसाठी रात्री 12 ते सकाळी 5 यावेळेत 25 टक्के अतिरिक्त भाडे आकारणीस परवानगी. महापालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागांतील रिक्षांना रात्री 12 ते सकाळी 5 पर्यंत 40 टक्के भाडे आकारणीस मान्यता. रिक्षातील प्रवाशांसोबत असलेल्या मोठ्या आकाराच्या साहित्याला द्यावे लागणार पाच रुपयांचे शुल्क. 90 दिवसांच्या मुदतीत मीटर प्रमाणीकरण न करणार्‍या रिक्षांना ही भाडेवाढ लागू राहणार नाही.

अशी आहे सुधारित भाडेवाढ
दीड किलोमीटर : 23 रुपये, तीन किलोमीटर : 46 रुपये, साडेचार किलोमीटर : 68 रुपये, सहा किलोमीटर : 91 रुपये, आठ किलोमीटर : 121 रुपये, दहा किलोमीटर : 151 रुपये

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news