ज्या सुखा कारणे देव वेडावला

देव
देव

वारी केल्यास अनेक लाभ पदरी पडतात, निष्ठा बळकट होते. अंतरीचे प्रेम वर्धिष्णू होते. संत सज्जनांच्या भेटी होतात. वारी म्हणजे देव आणि भक्ताचे उच्च पातळीवरील संमेलनच असते. ज्ञानेश्‍वर महाराज ज्ञान आणि योग विसरून वारीच्या भक्तीप्रेमरसात तन्मय झाले. एकनाथ महाराजांनी वारीस साधनाचे सार म्हटले आहे. विठ्ठल हे काही नवसाला पावणारे दैवत नव्हे, किंबहुना विठ्ठलाकडे नवस बोलला जात नाही. विठ्ठलाचे दर्शन घेतल्याने किंवा त्याची पूजा बांधल्याने ऐहिक सुखाची प्राप्ती होत नाही. उलट विठ्ठलाची उराउरी भेट घेतल्याने आध्यात्मिक अनुभूती लाभते. त्यासाठीच ही वारी.

ज्या सुखा कारणे देव वेडावला,
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला ॥ धृ ॥
धन्य धन्य संताचे सदन
तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण ॥ 1 ॥

आषाढी, कार्तिक, माघी अथवा चैत्री यांपैकी एका शुद्ध एकादशीस गळ्यात तुळशीची माळ घालून जो नियमाने पंढरपुरास जातो तो पंढरपूरचा वारकरी आणि त्यांच्या उपासनेचा मार्ग म्हणजे वारकरी पंथ.

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा ।
आनंदे केशवा भेटताची ॥
या सुखाची उपमा नाही ।
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥
पंढरीची वारी कशासाठी करायची?

असा प्रश्‍न वारीला न गेलेल्या वा वारीला जाण्यास इच्छुक नसलेल्या अनेकांना पडतो. वारीत काय आहे ? काय मिळणार आहे, ही वारी करून? नुसतं चालणं म्हणजे वारी का? वारी करणं म्हणजे काम नसणार्‍यांचे काम. म्हातारपणी वारी करायची असते, वारीत सगळी अस्वच्छता असते. हे सगळं सगळं कसं सांभाळून घ्यायचं? वारी म्हणजे रिकामटेकड्या लोकांचे काम, मला एवढ्या गर्दीत जायला आवडंत नाही, वारी करून कुठं विठ्ठल भेटतो का? असे अनेक प्रश्‍न निर्माण होणार्‍या नास्तिक, आस्तिक, पूर्णवेळ-अर्धवेळ भक्त-अभक्तांना एक सांगावेसे वाटते की, एकदा तुम्ही वारीला येऊन पहाच. तुम्हाला तुमच्या प्रश्‍नांची सर्व उत्तरं मिळतील, असे म्हणावेसे वाटते.

महाकाव्य ज्ञानेश्‍वरीमध्ये 'एक तरी ओवी अनुभवावी,' असे म्हटले आहे. पंढरीची वारी करून वर्षभरासाठी टॉनिक घेऊन आलेला वारकरी मात्र 'एक तरी वारी करावी, अनुभवावी' असेच म्हणतो. वारीत देव तर भेटतोच, शिवाय देवासारखी माणसंही भेटतात. माणसानं माणसाशी

कसं वागायचं ? हे देखील येथे शिकायला मिळतं.
रात्री न कळे दिवस न कळे ।
अंगी खेळे दैवत हे ॥
एक-एक दिवस येतो – जातो, वाटेत गावे येतात – जातात.

पंढरी आणखी जवळ आली आहे, याचे समाधान सर्व थकवा दूर घालवते. सर्वांची शारीरिक व मानसिक अवस्था भिन्न असली तरी सर्वांच्या हृदयाच्या गाभार्‍यात माऊलींच्या प्रेमाची अखंड ज्योत तेवत असते. सर्वांच्या हृदयात आपणाबरोबर माऊली आहेत, तिचा हात धरून आपण चालत आहोत, ही गोड भावना असते. 'निर्मळ चित्ते झाली नवनिते, पाषाणा पाझर फुटती रे' असा अनुभव येतो. चिंता व काळजीने ग्रासलेले मन या वातावरणात आल्यावर आपसूकच त्याला संजीवनी मिळते. पंढरीची वारी इतर सर्व तीर्थयात्रेहून अधिक श्रेष्ठ आहे. वाराणसीत मोक्ष, गयेला पितृऋणाचा नाश, मात्र पंढरीत रोकडा लाभ होतो, असे संत तुकाराम महाराज म्हणतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news