ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे अवैध धंद्यांना आळा

ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे अवैध धंद्यांना आळा
Published on
Updated on

सांगोला : पुढारी वृत्तसेवा ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. याकरिता ग्रामसुरक्षा यंत्रणेने सहभाग नोदवावा, असे सांगून पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी एक हजार घरांचे प्रस्ताव सोलापूर जिल्ह्यातून पाठवले आहेत, अशी माहिती सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. सांगोला पोलिस स्टेशनच्या वार्षिक निरीक्षणाच्या निमित्ताने व पोलिस पाटलांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या की, सर्वच अवैध धंद्यांवरती कारवाया करण्यात आल्या आहेत.परंतु, या कारवाया पुरेशा नाहीत, त्या कारवाया वाढल्या पाहिजेत. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सन 2020 पेक्षा 2021 मध्ये जुगार, दारू, हातभट्टी यावर अधिक कारवाया झाल्या आहेत, तर सन 2022 मध्ये त्यापेक्षा अधिक आहेत. अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. अवैध वाळू धंद्यासह वाळू चोरांची पाठराखण करणार्‍या पोलिसांवर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. नगरपरिषदेचा भाग वगळता प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे. या माध्यमातून दरोडे, घरफोड्या, अपहरण, अवैध दारू व्यवसाय, वाळू चोरी हे थांबवले आहेत. या ग्रामसुरक्षा यंत्रणेचा यापुढेही अधिक प्रभावी वापर करुन जिल्ह्यातील अवैध व्यवसाय व विशेषतः वाळू चोरी कमी करता येऊ शकेल. दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींवर तडीपारीचीही कारवाई करण्यात येत आहे. अवैध धंद्यांबाबत स्थानिक नागरिकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेशी संवाद साधला तर निश्चितपणे या धंद्यांना आळा बसू शकेल. 'ऑपरेशन परिवर्तन' हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात माझ्या संपूर्ण टीमचे यश आहे. सांगोला पोलिसांच्या निवासाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून एक हजार पोलिसांच्या घराचे प्रस्ताव पाठवले आहेत, असे सांगितले.

वाळू माफियांना सहकार्य करणार्‍यांवर कारवाई करा

सांगोला तालुक्यामध्ये माण, कोरडा, अप्रुफा, बेलवण नदी पात्रांतून दररोज दिवसरात्र हजारो ब्रास वाळू उपसा केली जाते. या वाळू चोरीकडे अधिकार्‍यांनीच पाठ फिरवल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. तालुक्यामधील वाळू माफियांचे आणि अधिकार्‍यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने बर्‍याच वेळा वाळू चोरी करणार्‍या गाड्या पकडूनदेखील त्या गाड्या सिस्टिममधील असल्याने सोडून दिल्या असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दररोज हजारो ब्रास वाळू उपसा करणार्‍या वाळू माफियांबरोबरच शेतातून वाट देऊन वाळू चोरांना सहकार्य करणार्‍या शेतकर्‍यांवरदेखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून होऊ लागलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news