नातेपुते : पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होणार्या वारकर्यांची, टाळकर्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढतच आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर एवढ्या संख्येने येणार्या वारकर्यांना राहण्याची व्यवस्था कशी केली जात असेल? याचे अनेकांना कुतूहल आहे. तीन ते चार लाख वारकरी पालखीतळ परिसरात असणार्या तंबूमध्ये, राहुट्यांमध्ये, ट्रकखाली, ट्रकमध्ये, उघड्यावर, रस्त्यावर, डोंगरावर कुठेही झोपतात. ही सारी व्यवस्था माऊली करतात. अशी त्यांची श्रद्धा आहे.
वारीतील मुक्कामाच्या ठिकाणी उभारलेल्या एका तंबूत 20 ते 30 वारकरी राहू शकतात. त्यानुसार प्रत्येक दिंडीत 15 ते 50 इतके तंबू (राहुट्या) असतात. ठरलेल्या जागेवरच पालखीतळ उभारला जातो. पालखी तळापासून प्रत्येक दिंडीचा मुक्काम कोणत्या ठिकाणी असावा, ती जागासुद्धा अनेक वर्षांपासून एकच आहे. नित्यनेमाने वारी करणार्या वारकर्यांना या जागादेखील आता ओळखीच्या झाल्या आहेत. ही जागा माहिती असणारा वारकरी दिवसभरात कुठेही हरवला किंवा आपल्या दिंडीपासून दूर गेला तर मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो.
अगदी कमीत-कमी जागेत अनेक दिंड्या आपले तंबू उभारतात. या तंबूंची दिशा, जागादेखील निश्चित आहे. साहित्य घेऊन आलेला ट्रक पालखीतळावर मध्यभागी विशिष्ट ठिकाणी उभा केला जातो. या ट्रकच्या एका बाजूला भोजन तयार करण्यासाठी ताडपत्री सोडून जागा तयार केली जाते. ही ताडपत्री त्या ट्रकला बांधलेली असते. ताडपत्रीच्या दोर्या ताणून बांबूला बांधून तेथे भोजनाचे साहित्य ठेवले जाते. अशाप्रकारे वारी सोहळ्यातील भोजन कक्ष (किचन) तयार झाल्यानंतर सेवेकरी मुक्कामासाठी तंबू उभारण्याच्या कामाला हात घालतात. दुपारी 12-1 पर्यंत पालखी तळावर अनेक दिंड्यांचे तंबू तयार झालेले असतात.
सायंकाळी सातच्या सुमारास सोहळ्यातील वारकरी आपल्या ठरवून दिलेल्या तंबूत मुक्कामाला जातात. संध्याकाळी 7 ते पहाटे 3 पर्यंत या वारकर्यांसाठी तंबू हेच घर असते. पहाटे तीन वाजता सर्व तंबू पुन्हा काढले जातात. त्याचे साहित्य ट्रकमध्ये भरले जाते आणि ही वाहने पुढच्या मुक्कामाला रवाना होतात. गेली अनेक वर्षे माऊलींचा पालखी सोहळा सुरू आहे. वारीत कोणाला काहीच कमी पडत नाही. कोणीही उपाशी राहात नाही. कोणीच मानपान मागत नाही. कसलीही अडचण आली तरी मदतीसाठी अनेक हात धावून येतात. राहायला, झोपायला, खायला कसलीच अडचण येत नाही. अगदी निश्चिंत होऊन पुढे चालत राहायचे. माऊलींनी पुढची सगळी सोय केलेली असते. स्वर्गलोकीदेखील असा सोहळा पाहायला मिळत नाही. हा सोहळा पाहण्यासाठी देवांनासुद्धा पृथ्वीतलावरच यावे लागले आहे, अशी वारकरी समाजाची धारणा आहे. हा सोहळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी जगभरातून अनेक लोक वारीत सहभागी होत आहेत. वारीची खुमारी न्यारीच…