औरंगाबाद : एकतर्फी प्रेमातून झाला होता खून; 81 साक्षीदार अन् 12 किमीचे डिजिटल मॅपिंग

औरंगाबाद : एकतर्फी प्रेमातून झाला होता खून; 81 साक्षीदार अन् 12 किमीचे डिजिटल मॅपिंग
Published on
Updated on

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : 21 मे रोजी दुपारी 2 वाजता देवगिरी कॉलेजची विद्यार्थिनी सुखप्रीत कौर ऊर्फ कशीश (18, रा. उस्मानपुरा, गुरुद्वारासमोर) हिचा आरोपी शरणसिंग सविंदरसिंग सेठी (20, रा. उस्मानपुरा) याने एकतर्फी प्रेमातून खून केला होता. विशेष तपास पथकाने या गुन्ह्याचा 82 दिवसांत तपास पूर्ण करत 81 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. आरोपीविरुद्ध भौतिक, तांत्रिक, फॉरेन्सिक पुरावे गोळा केले असून, 12 किमीच्या डीजिटल मॅपिंगद्वारे तांत्रिक पुराव्यांची साखळी जोडली. पोलिसांनी तब्बल 657 पानांचे दोषारोपपत्र
नुकतेच न्यायालयात दाखल केले, अशी माहिती पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी बुधवारी (दि. 24) दिली.

आरोपी शरणसिंगने कशीशला देवगिरी कॉलेज परिसरातील रचनाकार कॉलनीत ओढत नेऊन तिच्या गळ्यावर, मानेत खंजीर (कृपाण) खुपसून क्रूरपणे संपवले होते. 'कॉलेजमध्ये इतर मुलांशी बोलते, पण माझ्याशी बोलत नाही,' या किरकोळ करणावरून त्याने हा खून केला होता. भरदिवसा अनेक प्रत्यक्षदर्शींच्या समोर ही घटना घडली होती. या प्रकरणी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते. गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश आघाव हे मुख्य तपास अधिकारी, तर पोलिस निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे, अजित दगडखैर हे सहाय्यक तपास अधिकारी होते. हवालदार सुनील बडगुजर व पोलिस नाईक वीरेश बने यांनी मदतनीस म्हणून काम केले. जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवावे, अशी मागणी होत असून पोलिस तसे पत्र देणार आहेत. तसेच, विशेष सरकारी वकील नेमण्याचीही मागणी केली जात आहे.

डिजिटल मॅपद्वारे जोडली पुराव्यांची साखळी

1. खून करण्यापूर्वी आणि नंतर आरोपी शरणसिंगने काय केले, त्याचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही फुटेजनिहाय कशीश व शरणसिंगचे सीडीआर, टॉवर लोकेशन, अक्षांश-रेखांश आधारे जोडण्यासाठी एक्सपर्टकडून पाच डिजिटल मॅप तयार करण्यात आले आहेत.

2. पहिल्या नकाशात देवगिरी कॉलेज परिसरात शरणसिंग कशीशचा पाठलाग करत असलेला मार्ग दर्शवला आहे.

3. दुसर्‍या नकाशाद्वारे आरोपीने कशीशला ओढत रचनाकार कॉलनीत नेल्याचा मार्ग दाखवला आहे.

4. खून केल्यावर रचनाकार कॉलनीतून पायी कोकणवाडी चौकापर्यंत आणि त्यानंतर रिक्षाने व्हिट्स हॉटेल, रेल्वेस्टेशनमार्गे पळून गेल्याचा मार्ग दाखवणारा मार्ग तिसऱ्या नकाशात दखवला आहे.

5. चौथ्या नकाशामध्ये शरणसिंगने पळूनजाताना औरंगाबाद ते मनमाड रेल्वे ट्रॅकवर खंजीर व मोबाइल फेकून दिला होता. तो जप्त करताना त्याचाही मार्ग दाखवण्यात आला आहे.

6. पाचव्या नकाशात सीडीआर, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मृत कशीश, आरोपी शरणसिंग आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हे घटनास्थळी असल्याचे सिद्ध करणारे तांत्रिक पुरावे जोडण्यात आले आहेत.

दोषारोपपत्रातील वैशिष्ट्ये

प्रत्यक्षदर्शींसह तब्बल 81 साक्षीदारांचे जबाब.

घटनास्थळावरील तसेच मयत आणि आरोपीच्या कपड्यावरील रक्ताचा भौतिक पुरावा.

सीसीटीव्ही फुटेज, क्राइम सीनचे रिक्रिएशन करून पंचनामा, सीडीआर, एसडीआर आणि टॉवर लोकेशनचा

तांत्रिक पुरावा

शवविच्छेदन अहवाल, एन्ज्युरी सर्टिफिकेट, शस्त्र तपासणी अहवाल आणि मृताच्या व आरोपीच्या कपड्यावरील रक्ताची डीएनए तपासणी करून न्यायसाहाय्यक वैद्यकीय पुरावे.

खून करण्यासाठी वापरलेले खंजीर, पळून जाताना फेकून दिलेला मोबाइल आणि आरोपीचे कपडे जप्त करताना केलेला मेमोरंड्म पंचनामा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news