‘एनटीपीसी’त कोळशासह बायोमासही जाळणार

‘एनटीपीसी’त कोळशासह बायोमासही जाळणार
‘एनटीपीसी’त कोळशासह बायोमासही जाळणार

सोलापूर : महेश पांढरे सोलापूरच्या एनटीपीसीमध्ये दगडी कोळशाबरोबर सात ते दहा टक्के बायोमास जाळण्यास परवानगी मिळाली असून पुढच्या दोन महिन्यांत याचे टेंडर निघणार आहे. यानंतर सोलापूर एनटीपीसीला वर्षाला सहा लाख 60 हजार मेट्रिक टन बायोमास लागणार असल्याची माहिती सोलापूर एनटीपीसीचे मुख्य महाप्रबंधक श्रीनिवास राव यांनी पाशा पटेल यांच्याशी चर्चा करताना दिली. थर्मल पॉवर सेंटरमध्ये बायोमास ज्वलनाच्या विषयावर पाशा पटेल यांनी सोलापूर एनटीपीसीला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. आमदार सुभाष देशमुख यांच्या नियोजनाने एनटीपीसी कार्यालयात हा संवाद झाला. एनटीपीसीचे डीजीएम गुरुदास मिश्रा, एचआर जीएम श्रीनिवास मूर्ती यांची यावेळी उपस्थिती होती.

पाशा पटेल म्हणाले, पॅरिस कराराप्रमाणे कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी आता देशांतर्गत असलेल्या सर्व थर्मल पॉवर सेंटरमधून दगडी कोळशाचे ज्वलन टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येत आहे. कारण जास्तीचे कार्बन उत्सर्जन हे पृथ्वीच्या तापमानवाढीला मदत करीत आहे. एकट्या सोलापूर थर्मलमधून रोज दोन हजार मेट्रिक टन दगडी कोळसा जाळला जातो. एक किलो दगडी कोळसा जाळला तर दोन किलो 800 ग्रॅम कार्बन उत्सर्जन होते. या नियमाप्रमाने सोलापूर एनटीपीसी रोज 56000 किलो आणि वर्षाला दोन कोटी एक लाख 60 हजार किलो कार्बन उत्सर्जन करते. एवढे कार्बन उत्सर्जन होत राहिले तर या पृथ्वीवर मानव जातच राहणार नाही. दगडी कोळशाला पर्याय म्हणून आता बायोमास वापरण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. या बायोमासमध्ये चार हजार उष्मांक असलेले बायोमास लागते. त्यानुसार दगडी कोळशाइतकाच उष्मांक बांबूमध्ये असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

एचआर जीएम श्रीनिवास मूर्ती म्हणाले की, यासंबंधीची टेंडर प्रक्रिया ही आमच्या केंद्रीय कार्यालयातून राबविली जाणार आहे. आपल्या परिसरातील शासकीय नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्थांनी याचे टेंडर भरून बायोमास पुरविला, तर याचा स्थानिक शेतकर्‍यांना लाभ मिळू शकतो. डीजीएम गुरुदास मिश्रा यांनी बायोमास वापराच्या नीतीची माहिती दिली. यावेळी पाशा पटेल यांच्यासमवेत सेंद्रिय शेतीचे शेतकरी अंकुश पडवळे, मारापूर (मंगवळेढा)चे शेतकरी हरी यादव, सोलापूरचे संतोष माळी आदींची उपस्थिती होती.

सोलापूर एनटीपीसीला वर्षाला लागणार्‍या 6 लाख 40 हजार बायोमासचा पुरवठा करायचा म्हटला तरी सोलापूर जिल्ह्यातील 17 हजार एकरावर बांबू लागवड करावी लागणार आहे. बांबू हे पीक लावल्यास चौथ्या वर्षांपासून कापायला येते आणि पुढची चाळीस ते शंभर वर्षे आपल्या शेतात राहते. शून्य आंतर मशागत, झीरो बजेट कामगार खर्च आणि उसाच्या दहा टक्के पाण्यात येणारे आणि चार ते पाच हजार रुपये टन भावाने विकले जाणारे बांबू पीक सोलापूरच्या शेतीचे अर्थचक्र बदलू शकते, असा विश्वासही पाशा पटेल यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news