उजनी आज अर्धशतक पार करणार

उजनी आज अर्धशतक पार करणार

बेंबळे : पुढारी वृत्तसेवा उजनी धरण परिसरामध्ये मागील आठवडयापासुन सुरु असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणी पातळीमध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. (दि.12) उजनी धऱण प्लसमध्ये आल्यानंतर मागील सहा दिवसांमध्ये त्यामध्ये समाधानकारक वाढ होऊन उपयुक्त साठयापैकी निम्मा पाणी साठा धरणामध्ये झाला आहे. सध्या धरणामध्ये 89.12 टी.एम.सी. पाणीसाठा असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 48.52टक्के इतकी आहे. भिमा खोर्‍यातील भिमाच्या उपनद्यांवरील सर्व प्रकल्प सर्व क्षमतेने भरले असल्याने बंडगार्डन येथून 11061.क्युसेकचा विसर्ग येत आहे. तर दौंडचा विसर्ग 23995 क्युसेकने उजनी धरणात मिसळत असून धरणामध्ये हा विसर्ग कायम राहिल्यास जुलै अखेर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पुणे, अहमदनगर व सोलापुर जिल्ह्यातील शेतकऱी, उदयोजक व सामान्य नागरिकांसाठी उजनी धरण अत्यंत महत्वाचे आहे. उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता ही 117 टी.एम.सी. आहे. त्यापैकी 63.65 टी.एम.सी. पाणीसाठी मृत पाणीसाठा आहे तर 53.57 टी.एम.सी. पाणीसाठा उपयुक्त आहे. चालु वर्षी पुणे जिल्ह्यातील इंदापुर, दौंड तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत व सोलापुर जिल्ह्यातील करमाळा आदी तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला नव्हता त्यामुळे शेतकर्‍यांची नजर उजनी धरणावर होती. जुन अखेर धरणांमध्ये वजा 12.42 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे लाभ क्षेत्रामध्ये खरीपाच्या पीक लागवडीवर मोठा परिणाम जाणवत होता.

परंतु 12 जुलैपासुन धरण क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या दमदार पावसांमुळे धरणातील पाणीसाठा सातत्याने वाढला आहे. 19 जुलै रोजी धरण प्लसमध्ये आले तर सध्या धरणांमध्ये 50 टक्के उपयुक्त पाणी साठा झाला आहे. एकुण उपयुक्त पाणीसाठ्यापैकी निम्म्याहून अधिक उपुयक्त पाणी साठा झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.दरम्यान उजनी धरणाच्या पाणी पातळीत झालेली समाधानकारक वाढ व पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यवृष्टीमुळे येणारा विसर्ग पाहता खबरदारीचा उपाय म्हणून पाणीसाठा नियंत्रित करून संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी उजनी धरणातून वीज निर्मिती कालवा 1 व बोगद्यात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्याची मागणी भीमा काठचे शेतकरी करित आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news