भगवान चिले, दुर्गअभ्यासक
गेले दोन-चार दिवस राजगडावर रोप वे होणार या वार्तेने दुर्गप्रेमींत अस्वस्थता आहे. तसं नाशिकच्या अंजनेरीचा प्रश्न असो वा ब्रम्हगिरीचा डोंगरच खिळखिळा करण्याचे काम असो, गिरीप्रेमी आधीच अस्वस्थ होते, त्यात आता ही राजगडच्या रोपवेची नवी भर.
गेली दोन तपे आपल्या राज्याचे शासनकर्ते मग ते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना गड विकास म्हणजे गडाचा तट तोडून गडाच्या छाताडावर डांबरी रस्ता करणे ( उदा: भुदरगड, सामानगड, पारगड, कलानिधीगड ( ही झाली फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील गडकिल्ल्यांची नावे)), गडावर वीज नेऊन कसेही वास्तूं समोर पोल टाकणे, गडांवर गरज नसताना चिर्याचे, दगडाचे वा पेव्हिंग ब्लॉकचे पाथ वे करणे, गडावरील दरी काठांवर लोखंडी पोल बसविणे अशी नको ती कामे आरंभली आहेत ( यात पुरातत्व विभाग, वनविभाग, स्थानिक जिल्हा परिषद) असे सर्वच शासकीय विभाग आघाडीवर आहेत. यात आता नवी भर पडलीय रोप-वेची. खरेतर शिवरायांचे बर्यापैकी दुर्ग 'दुर्गम'. दुर्गमत्व हेच त्यांचे मूळ वैशिष्ट्य. ते अवघड, ऊत्ताल डोंगरावर आहेत त्यामुळे तर ते सर्वच दुर्गप्रेमींना चढायला उतरायला आवडतात. पुणे जिल्ह्यातील राजगड ही असाच, अवघड वाटेचा, दुर्गअवशेषांनी, शिवस्पर्शाने पवित्र असा गड म्हणून हा राजधानीचा किल्ला कसलेल्या दुर्गप्रेमींच्या गळ्यातील ताईतच जणू. पण आता या गडावर देखील रोप-वे ऊभारणार म्हणून शासनाने जाहीर केले आहे.
याला आदर्श कुणाचा तर रायगडच्या रोपवेचा. रायगडच्या रोपवेने कशी ज्येष्ठ नागरीकांची सोय झाली, गडाचे पर्यटन कसे वाढले, गडपरिसरातील लोकांना कसा रोजगार मिळाला याचा हवाला दिला जातोय. पण मुळातच रायगडमध्ये व राजगडमध्ये जो मुख्य फरक आहे तो लक्षात घेतला जात नाही आहे. रायगडाच्या माथ्यावर हजारो पर्यटक आले तरी वर फिरायला सपाटी आहे, बर्यापैकी प्रशस्त वाटा आहेत पण अशी सपाटी, सुगम वाटा राजगडाच्या माथ्यावर नाहीत. राजगडाच्या माथ्यावरील सर्व वाटा अवघड व चिंचोळ्या आहेत. एकवेळ राजगडावर रोप-वेने जरी सामान्य पर्यटक आला तरी त्याला बिनधास्तपणे वावरायला गडावर मार्ग नाहीत.
गडावर रोपवे मुळे येणार्या हजारो पर्यटकांना राजगडचा डोंगर वर सपाटी नसल्याने सांभाळू शकणार नाही हे निर्विवाद सत्य आहे. राजगडावर वर येणार्या हजारो लोकांना पुरेल एवढे पिण्याचे पाणी नाही वा वर साधे शौचालय, बाथरूमही नाही की वर नाष्टा-पाणी मिळण्यासाठी हॉटेल्स् बांधावी म्हटलं तर तशी प्रशस्त जागा नाही. राजगडाच्या बालेकिल्ल्याचा मार्ग तर भलताच अवघड. एकवेळ रोप-वेने राजगडावर येणारा सामान्य माणूस या बालेकिल्ल्याला कसा चढणार हाही एक मोठा प्रश्नच आहे.
असे एक ना अनेक प्रश्न राजगड रोप-वे बाबतीत आहेत. शासनाने आधीच राजगडाच्या पाली दरवाजा मार्गावरील खंडोबाच्या माळापर्यंत डोंगर फोडून रस्ता आणलेला आहे. तेथेपर्यंत गाडीने सामान्य पर्यटक आला तर त्याला तेथून पुढे सव्वा ते दीड तासाची डोंगर चढाई करावी लागते. यातही निम्म्या मार्गावर शिवरायांची पायर्या केल्या आहेत. याशिवायही राजगडावर येणारे अनेक मार्ग आहेत पण ते खास आहेत डोंगर भटक्यांसाठी. पालीचा राजरस्ता सर्वांसाठी सोयीचा आहे. पण तरीही रोप-वेचा हट्ट केला जातोय.
रोप – वे पेक्षा अन्य कामे महत्त्वाची
वास्तविक रोप-वे पेक्षा प्राधान्याने कराव्यात अशा अनेक बाबी राजगडाबाबतीत आहेत. गडावरील विजेचे पोल काढून जमिनीअंतर्गत केबल टाकून सोय केली पाहिजे. गडावरील पद्मावती तलावावर पंप बसवून त्याचे पाणी टॉयलेट-बाथरूम साठी वापरणे, गडावरील इतर सर्व पिण्याच्या पाण्याची टाकी साफ करून त्यात कचरा पडू नये म्हणून त्यावर जाळ्या मारणे, सुवेळा माची असो वा संजीवनी माची जिथे गरज असेल त्या ठिकाणी दगडी पायर्या करणे, पावसाळ्यात गडाच्या माथ्यावरून कसेही व कुठेही वाहणारे पाणी योग्य त्या ठिकाणावरून त्याला मार्ग करून देणे, गडावरील ऐतिहासिक वास्तूंच्या चौथर्यांची ऊत्खनने करणे, गडावरील तट, बुरूजांवर ऊगवलेली झाडे तोडून त्यांच्या दरजा चुन्याने भरणे, तटमाथ्यातून तटात पाणी मुरू नये म्हणून त्यांच्या डोक्याला चुन्याचा गिलावा करणे व पडत असणारे तट अग्रक़माने बांधणे अशी अनेक कामे राजगड बाबतीत ताबडतोपीने करणे गरजेचे आहे.
असे असताना व वरील कामे केली नसताना वा केल्यानंतर ही रोप-चा आग्रह राजगडसाठी चुकीचाच आहे. राजगड चढून जाण्यातच खरा आनंद आहे. तो चढत असतानाच वा बालेकिल्ल्याची चढाई तेथील खोबण्यात हात घालून, शरीर तोलून जातानाच जिजाऊ साहेबांचे, शिवरायांचे, शंभू राजांचे मावळ्यांचे कष्ट आपल्याला कळू शकतात. रोपवेने ते शक्य नाही. म्हणून आम्ही सर्वच दुर्गप्रेमी राजगड रोपवेचा निषेध करतो व आमचा हा राजगड रोपवे विरोधातील लढा गरज पडल्यास रस्त्यावर ऊतरून वेगवेगळ्या मार्गाने करू.