‘लोकांमध्‍ये वैज्ञानिक दृष्टीकोण रुजणे महत्त्‍वाचे’

Published on
Updated on

अॅडम स्मिथ यांनी विज्ञान हे अंधश्रध्देच्‍या विषावर चांगले औषध आहे, असे म्हटले. सध्याचे युग हे 'ज्ञानयुग' म्हणून ओळखले जाते. तंत्रज्ञानाचा डोळ्याला थक्क करणारा विकास घडून आला आहे. पण ढोबळ अर्थाने संकल्पनांचा वापर करताना आपण गंभीर नसतो. तंत्रज्ञान म्हणजे निव्वळ विज्ञान नव्हे. विज्ञान ही व्यापक संकल्पना आहे. तंत्रज्ञान हे विज्ञानाचे उपयोजन असते. त्यामुळे तंत्रज्ञानात आपण प्रगती केली म्हणजे विज्ञानाची प्रगती झाली असे होत नाही. वैज्ञानिक दृष्टीकोन जेव्हा लोकांमध्ये मोठया प्रमाणात रूजेल तेव्हाच वैज्ञानिक प्रगती झाली, असे आपण म्हणू शकू. जग संधीसाधूप्रमाणे केवळ विज्ञानाचा तांत्रिक फायदे घेत आहे. पण त्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन नको आहे. थोडक्यात विज्ञानाची सृष्टी पाहिजे पण विज्ञानाची दृष्टी नको आहे. 

१० नोंव्हेबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होत आहे. पण, हा नुसता विज्ञान दिन म्हणता येत नाही. कारण विज्ञानाचा फायदा घेत अणुबॉम्‍ब, रासायनिक शस्त्रे, अत्याधुनिक शस्त्रे बनवली जात आहेत.  मानवास अशा वैज्ञानिक प्रगतीची गरज नाही. म्हणूनच 'युनेस्को' ने हा विज्ञान दिन जाहीर करत असताना "आंतरराष्ट्रीय शांतता व प्रगतीसाठी विज्ञान दिन" असे हेतूपुर्वक जाहीर केले आहे.

आज सर्वत्र हिंसाचार, युध्द, धार्मिक दंगली, अंधश्रध्दांचा बाजार मांडला असताना विज्ञान दिनाचे महत्व अधोरेखित होते. विज्ञानाची थेट संबंध चिकित्सेशी येतो. त्यामुळे अंधश्रध्दा पसरविणाऱ्या धर्मसंस्था व धर्मसंस्थेमध्ये हितसंबंध लपलेली राज्यसंस्था या दोघांनाच वैज्ञानिक दृष्टीकोनाचे वावडे आहे. कारण, विज्ञान म्हणजे 'सत्यशोधन' होय.  

वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या आधारे जर सत्य शोधायला लागलो तर भूताचे, शुभ- अशुभ, बळी, प्रसाद, पुजारी, नवस, देवदासी, धर्मग्रंथ, जातीव्यवस्था, स्त्री-पुरूष  विषमता, पवित्र-अपवित्र या सर्व संकल्पनांचा भांडाफोड होतो. त्यामुळे जाणीवपूर्वक धर्मसंस्था व राज्यसंस्था यांच्याकडून वैज्ञानिक दृष्टीकोन दडपला जातो. यामध्ये मग देवाने स्पृश्य-अस्पृश्य कल्पना व जातिव्यवस्था निर्माण केली असे म्हणता येत नाही किंवा केवळ स्त्रियांनाच अपवित्र केले गेले, यांचे समर्थन करता येणार नाही याची भिती असते.  

युनेस्कोच्या वतीने २००१ साली आंतरराष्ट्रीय शांतता व प्रगतीसाठी विज्ञान दिन साजरा करण्यात आला. व २००२ साली १० नोव्हेंबर या दिवशी पहिला विज्ञान दिन साजरा करण्यात आला. 

विज्ञान दिनाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे –

१)  शांतता व शाश्वत समाजासाठी विज्ञानाच्या भूमिकेबद्दल लोकांच्या जाणीवा समृध्द करणे. 

२)राष्ट्रा-राष्ट्रांतील विज्ञान देवाण-घेवाणीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बांधिलकीस प्रोत्साहन देणे.     

३) समाजाच्या हितासाठी विज्ञानाचा उपयोग करण्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कटिबध्दता पुनर्जिवित करणे. 

४) वैज्ञानिक परिश्रमासाठी समर्थन देण्यासाठी व विज्ञानासमोरील आव्हानांकडे लक्ष वेधण्यासाठी. 

भारतीय राज्यघटनेमध्‍ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये कलम ५१(A) नुसार वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारणे व त्याचा प्रसार-प्रचार करणे, हे कर्तव्य ठरविले आहे. पण, हे हेतूपुरस्कर टाळताना आपण पाहू शकतो. आपण जर विज्ञानाची कास धरली नाही तर जग एका भयान धोक्याच्या उंबरठ्‍यावर उभे आहे, ते आपण गमवून बसू. सध्या पर्यावरणाचा प्रश्न गंभीर आहे. केरळमध्ये आलेला पूर असो किंवा यवतमाळच्या जंगलात अवनी नावाच्या वाघिणीची हत्‍या असो किंवा शेतकऱ्यांच्या शेतीक्षेत्राच्या नुकसानीतून होणाऱ्या आत्महत्या असोत, या सर्वांची कारणे विज्ञान सांगत आहे. पण, मनुष्य याकडे सोयीस्करपणे  कानाडोळा करत आहे. ज्याचे हितसंबध वैज्ञानिक दृष्टीकोन विरोधी आहे. त्यांनी शास्त्रज्ञ ब्रुनोला जिवंत जाळले. आजही डॉ. नरेंद्र दाभोळकर याच्यांसारख्या व्यक्तीच्या हत्‍येतून वैज्ञानिक दृष्टीकोन व त्यातून येणाऱ्या समतामुलक समाजव्यवस्थेस विरोध होताना दिसत आहे. त्यामुळे या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन १० नोंव्हेबर याचे महत्त्‍व आणखी वाढले आहे.                                                               
                                                – गिरीश फोंडे, माजी आंतरराष्‍ट्रीय उपाध्यक्ष, वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रेटीक यूथ      

(File Pic)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news