विकासाचा अनुशेष भरणार तरी कधी?

Published on
Updated on

मंडणगड : विनोद पवार

एकेकाळी एखाद्या कर्मचार्‍याची बदली मंडणगड तालुक्यात झाली तर त्याला ती 'काळ्या पाण्या'ची शिक्षा झाल्याचे बोलले जात असे. आजही त्यामध्ये फारसा बदल झालेला नाही. हा तालुका छोटा असला तरी विकासाच्या बाबतीत मात्र कायमच मागे राहिला आहे. विधानसभेत येथून एका व्यक्‍तीला प्रतिनिधीत्व करण्याची आजवर संधी मिळाली. त्यामुळे विकासात हा तालुका कायमच मागे राहिला आहे. या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तरी मंडणगड तालुक्याचा विकासाचा अनुशेष भरुन निघेल का हा प्रश्‍न आहे.

दोन जिल्हा परिषद गट, चार पंचायत समिती गण व एकूण 54 हजार मतदारांच्या गणितावर मंडणगड तालुक्यामध्ये विधानसभा मताधिक्याची लढाई रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निसटती का होईना आघाडी मिळालेल्या  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या सहा महिन्यात संचारलेला उत्साह आघाडीला पुरेसा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तालुक्यात शिवसेनेत मोठे इनकमींग झाल्याने सातशे मतांची पिछाडी केव्हाच मागे पडल्याचा विश्वास सेनेस आहे. शिरगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीच्या विद्यमान पं. स. सदस्या प्रणाली चिले यांच्या पतीने सेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष सुलतान मुकादम यांचा म्हाप्रळ पंचक्रोशीसह तालुक्यातील अल्पसंख्याक मतावर असलेला प्रभाव याचबरोबर गेल्या चार महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यातील ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्रातील ग्रा.पं. सदस्यांचा सेनेत झालेला प्रवेश ही बलस्थाने शिवसेनेची आहेत. 

स्थानिक प्रश्न व तालुक्यातील क्रमांक एकचा पक्ष कोण हे ठरवण्यासाठीच मंडणगड तालुक्यात निवडणूक रंगणार आहे. जातीच्या गणितांचे आधारे तालुक्यात वर्षानुवर्षे निवडणुका होत असल्या तरी यावेळेस महिला मतदारांची अधिक संख्या व नवमतदारांचे अस्तित्व राजकीय गणितावर परिणाम टाकणार आहे. या आघाडीवर युवासेनेचे तालुक्यातील मोठे संघटन तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सेलचे संघटन यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी कसब लागणार आहे. मंडणगड तालुक्यातून यंदा अधिकचे मताधिक्य देण्यासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेत चढाओढ आहे. यात संख्याबळाच्या आधारे 65 टक्क्यांची आकेडवारी सांगणारा कुणबी समाज सर्वच पक्षांचे पहिले टार्गेट आहे. 

तालुक्यात दोन्ही पक्ष तुल्यबळ असल्याने सामना रंगतदार होणार आहे. अ‍ॅड. जी. डी. सकपाळ यांच्या आमदार पदाचा कार्यकाळ सोडता कुणबी समाजास मतदार संघात नेतृत्व करण्याची संधी मिळालेली नाही. त्यातही मंडणगड तालुक्यात मतदार संघाचे नेतृत्व करु शकले असे राजकीय व्यक्‍तिमत्वाची नेहमीच वानवा दिसून आली आहे. त्यामुळे तालुक्याचे म्हणून असलेले सर्वच प्रश्न प्रलंबित आहेत. लोकसभेत राष्ट्रवादीने केलेली सरशी मोडीत काढण्यासाठी सेना प्रयत्नशील आहे. 

युतीचे उमेदवार योगेश कदम यांनी अनेक मेळावे घेत पक्षीय ताकद वाढवण्यासाठी कंबर कसली आहे तर विद्यमान आ. संजय कदम यांनी वेळोवेळी विविध प्रश्नांवर, समस्यांवर मोर्चे आंदोलने करून जनतेच्या मनात घर करण्याचा प्रयत्न केला आहे. कामांच्या श्रेयवादावरून अनेक बाके प्रसंग दोन्ही पक्षांसह कार्यकर्त्यांनी अनुभवले. आपलीच बाजू कशी सरस होईल यासाठी दोघेही प्रयत्नशील आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news