उमरखेड : प्रतिनिधी
सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 21 सप्टेंबर पासून सुरू झाली असून, निवडणुकी दरम्यान अवैध दारू व पैसा थांबावा याकरिता प्रशासन कामाला लागले आहे. गुरूवारी संध्याकाळी वाशिम ते उमरखेड मार्गावरून जाणाऱ्या बोमुओ या गाडीची तपासणी केली. या गाडीमध्ये ६० लाख रूपयांची रक्कम मिळाली आहे. त्यामुळे निवडणुकीत पैशाचा महापूर आल्याचे चित्र दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिक ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे. गुरूवारी संध्याकाळी ५.३० ते ६.०० वाजण्याच्या दरम्यान गाडी क्र. एम.एच. २९.ए.आर.०९२२ बोमुओ ही गाडी वाशिमहून उमरखेडला जात होती. या गाडीची पळशी फाटा येथे तपासणी केला असता, या गाडीत ६० लाख रूपयांची रक्कम सापडली. पोलिसांनी ही रक्कम आणि गाडी जप्त केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.
या कारवाईत तपासधिकारी म्हणून मंडळ अधिकारी मुन, तलाठी व्यवाहारे, तसेच पोफाळी पोलिस ठाणेदार कैलास भगत, लखन जाधव, देविदास लाडगे, सुहास खंदारे आदी कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.