शब्दांकन – नरेंद्र साठे : पुण्यात आमच्या आजोबांनी लाँड्रीचा व्यवसाय सुरू केला, त्याला शंभरहून अधिक वर्षे झाली आणि त्यांनी आमच्याकडे सोपवलेली दिंडीची परंपरा आम्ही पुढे चालवत आहोत. आमची आजी सांगायची की, श्री संत गाडगे महाराज पुण्यात आल्यानंतर आमच्या घरी येत होते. वारीच्या वेळी वारकर्यांना घेऊन येत असत. त्यानंतर महाराजांनी आजोबांना पुढे दिंडी चालवण्यास सांगितले.
तेव्हापासून श्री संत गाडगे महाराज दिंडी क्रमांक 19 रथाच्या मागे, ही दिंडी आतापर्यंत सुरू असून, त्याला सुमारे 72 वर्षे झाली असतील. निटूर, नाशिक, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, जळगाव, अमरावती याशिवाय इतर जिल्ह्यांतील सुमारे 380 ते 400 वारकरी दिंडीमध्ये सहभागी होतात.
पालखी सोहळ्यामध्ये 33 वर्षांपासून पायी जात आहे. पहिल्यांदा 1989 साली 28 व्या वर्षी वारीला गेलो होतो. घरामध्ये ही पूर्वीपासून परंपरा आहे. चुलत्यांसोबत वारीला जाण्यास सुरुवात केली. ही परंपरा पुढे चालू आहे. वारीमध्ये सहभागी झालेला प्रत्येक वारकरी नामस्मरणात तल्लीन होऊन जातो. त्याला इतर कुठल्याही गोष्टीची चिंता त्या वेळी वाटत नाही. माऊलींचा जो समोर आनंद सोहळा असतो तो इतरत्र कुठेही अनुभवण्यास मिळत नाही. प्रत्येक वारकरी स्वतःचे भान हरपून या सोहळ्यात सहभागी होतो.
वर्षातील इतर दिवस माणूस त्याची कामे करतो, तर वारीतील सुमारे महिनाभर मिळणारा आनंद लुटण्यासाठी वारकरी सोहळ्यामध्ये दाखल होतात. आळंदीहून निघाल्यानंतर सोहळ्यात सहभागी होणार्या प्रत्येक वारकर्याला माउलींच्या सोहळ्यातून समाधान आणि आनंद मिळतो. या दिवसांमध्ये प्रत्येक जण हा वर्षभराची प्रसन्नता शरीरामध्ये साठवून परतत असतो. या प्रसन्नतेचे वर्णन करणेदेखील अवघड आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन पांडुरंगाची अखेरपर्यंत सेवा करता यावी, हीच अपेक्षा आहे. गतवर्षीही पायी वारी करता आली नाही, या वर्षीही पायी वारी कोरोनामुळे वारकर्यांना घडणार नाही.
आता पंढरपूरला गेल्यानंतर हा कोरोना लवकरात लवकर जाऊ द्या आणि आम्हाला तुमच्याकडे येऊ द्या, पांडुरंगा आम्हाला तुमच्या भेटीची आतुरता लागलेली आहे, असं साकडं पांडुरंगाला घालणार आहे. अनेकांचे फोन येतात, पांडुरंगाला भेटण्यासाठी जाऊ म्हणातात. मात्र, या कोरोनाच्या परिस्थितीत जाणे अवघड असल्याने त्यांना सध्याची परिस्थिती समजून सांगत आहे.